सामन्याची पाच मिनिटे शिल्लक असताना प्रतिस्पध्र्याकडून गोल पत्करावा लागल्यामुळे रिअल माद्रिदला व्हॅलाडोलिडविरुद्धच्या सामन्यात १-१ अशी बरोबरी पत्करावी लागली. या कामगिरीमुळे स्पॅनिश लीग फुटबॉल स्पर्धेच्या जेतेपदाच्या शर्यतीतील आव्हान संपुष्टात आले.
३५व्या मिनिटाला मिळालेल्या फ्री-किकवर सर्जीओ रामोसने रिअल माद्रिदचे खाते खोलले. याच आघाडीच्या बळावर रिअल विजय मिळवेल, असे वाटत होते. पण हम्बटरे ओसोरिओ याने ८५व्या मिनिटाला केलेल्या बळावर व्हॅलाडोलिडने हा सामना बरोबरीत राखण्याची किमया केली. त्यामुळे रिअल माद्रिद संघ अग्रस्थानी असलेल्या अ‍ॅटलेटिको माद्रिदपेक्षा (८८ गुण) चार गुणांनी पिछाडीवर पडला आहे. बार्सिलोना ८५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
रिअल माद्रिदचे पुढील दोन्ही सामने अनौपचारिक राहिले तरी या सामन्यात ख्रिस्तियानो रोनाल्डोला झालेली दुखापत हा रिअल माद्रिदसाठी मोठा धक्का बसला. रोनाल्डोच्या अनुपस्थितीत सर्जीओ रामोसने फ्री-किकवर गोल लगावला. रोनाल्डो आता उर्वरित दोन्ही सामन्यांना मुकणार आहे. २४ मे रोजी अ‍ॅटलेटिको माद्रिदविरुद्ध होणाऱ्या चॅम्पियन्स लीग चषकाच्या अंतिम फेरीसाठी तो तंदुरुस्त होण्यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे.