सरत्या वर्षांच्या अखेरीस स्पॅनिश लीग फुटबॉल स्पर्धेच्या जेतेपदाचा दावेदार बनण्यासाठी जबरदस्त चुरस पाहायला मिळत आहे. वर्षअखेरीस संपणाऱ्या पहिल्या टप्प्यात अव्वल स्थानावर विराजमान असलेल्या बार्सिलोनाला गाठण्यासाठी रिअल माद्रिदची चढाओढ सुरू आहे तर आपले अव्वल स्थान अबाधित राखण्यासाठी बार्सिलोना कंबर कसत आहे.
रविवारी रात्री रंगलेल्या सामन्यात दोन गोलच्या पिछाडीनंतर प्रेडो रॉड्रिगेझने साकारलेल्या हॅट्ट्रिकमुळे बार्सिलोनाने गेटाफेवर ५-२ असा विजय मिळवला. त्यानंतर जायबंदी झालेल्या गॅरेथ बॅलेच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या रिअल माद्रिदने व्हॅलेन्सियाचा ३-२ असा पाडाव करत तिसरे स्थान कायम राखले.
यजमान गेटाफेने जबरदस्त सुरुवात करत पहिल्या १५ मिनिटांतच २-० अशी भक्कम आघाडी घेतली होती. सर्जीओ ईस्कूडेरो आणि लिसांड्रो लोपेझ यांनी गोल करत गेटाफेला शानदार मजल मारून दिली होती. पण पहिले सत्र संपण्याच्या आधी प्रेडोने आठ मिनिटांत तीन गोल झळकावत बार्सिलोनाला मुसंडी मारून दिली. ३५व्या, ४१व्या व ४३व्या मिनिटाला गोल करत प्रेडोने हॅट्ट्रिक साजरी केली. त्यानंतर सेस्क फॅब्रेगसने चार मिनिटांच्या अंतराने दोन गोल करत बार्सिलोनाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
मांडीचे स्नायू ताणले गेल्यामुळे सलग दुसऱ्या सामन्यात बॅलेला अंतिम संघातून वगळण्यात आले. त्याच्या जागी संधी मिळालेल्या अँजेल डी मारियाने २८व्या मिनिटाला रिअल माद्रिदचे खाते खोलले. पण पाबलो पिआट्टीने सहा मिनिटांनंतर हेडरद्वारे गोल झळकावत व्हॅलेन्सियाला बरोबरी साधून दिली. डी मारियाने मिळवलेल्या फ्री-किकवर ख्रिस्तियानो रोनाल्डोने दुसरा गोल करत रिअल माद्रिदला आघाडीवर आणले. पण जेरेमी मॅथ्यूने दानी परेजोच्या क्रॉसवर रिअल माद्रिदचा गोलरक्षक दिएगो लोपेझला चकवत गोल करून व्हॅलेन्सियाला सामन्यात पुनरागमन करून दिले. अखेर १० मिनिटे शिल्लक असताना जेसे रॉड्रिगेझने गोल करीत माद्रिदला विजयी केले.

Story img Loader