Rohit Sharma’s reaction to Indian team participating in T20 World Cup 2024 : अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-२० मालिकेत भारताने ३-० असा विजय नोंदवत मालिका खिशात घातली. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना उत्कंठेच्या शिखरावर होता, ज्यामुळे बरोबरीनंतर सामन्याच्या निकालासाठी दोन सुपर ओव्हर्स घ्याव्या लागल्या. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये भारताच्या विजयानंतर कर्णधार रोहित शर्माने आगामी टी-२० विश्वचषकातील टीम इंडियाच्या संघाबद्दलही मत मांडले. रोहितने सांगितले की, त्याने प्रशिक्षक राहुल द्रविडसह आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी ७-८ खेळाडूंचे स्थान जवळपास निश्चित केले आहे. या आधारे १५ सदस्यीय खेळाडूंचा संघ निवडला जाईल.
आयसीसी टी-२० विश्वचषक जूनमध्ये होणार असला, तरी विश्वचषकापूर्वी टीम इंडियाचे मिशन टी-२० येथेच संपले. आता ते थेट जूनमध्ये होणाऱ्या विश्वचषकात सहभागी होणार आहेत. याआधी, भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळताना दिसणार आहे. त्यानंतर भारतीय संघाचे खेळाडू आयपीएल २०२४ मध्ये त्यांच्या संबंधित फ्रँचायझींसाठी खेळताना दिसतील.
“परिस्थितीनुसार आम्ही आमची टीम कॉम्बिनेशन ठरवू” –
यावेळी कर्णधार रोहित म्हणाला, “आम्ही १५ सदस्यीय संघ निश्चित केलेला नाही, मात्र ८ ते १० खेळाडू आमच्या मनात आहेत. त्यामुळे परिस्थितीनुसार आम्ही आमची टीम कॉम्बिनेशन ठरवू. वेस्ट इंडिजमध्ये खेळपट्टी आणि परिस्थिती कशी आहे, पाहून आम्हाला त्यानुसार संघ निवडावा लागेल. जोपर्यंत माझा आणि राहुल द्रविडचा संबंध आहे, आम्ही स्पष्टता राखण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही खेळाडूंना का निवडले आणि का नाही निवडले हे सांगण्याचा प्रयत्न करत आहोत.”
हेही वाचा – IND vs AFG 3rd T20 : “मला आठवत नाही की…”, विजयानंतर कर्णधार रोहित शर्माने दिली सुपर ओव्हरबद्दल प्रतिक्रिया
“तुम्ही प्रत्येकाला कायम आनंदी ठेवू शकत नाही”-
रोहित शर्मा पुढे म्हणाला, “तुम्ही प्रत्येकाला कायम आनंदी ठेवू शकत नाही. माझ्या कर्णधारपदाच्या काळात मला हेच शिकायला मिळाले. तुम्ही १५ खेळाडूंना आनंदी ठेवू शकता. यानंतर फक्त ११ आनंदी होतील. जे प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी असतील. त्यानंतर बेंचवर बसलेले ४ खेळाडूही नेहमी विचारतात की ते का प्लेइंग इलेव्हनमध्ये नाहीत. मी शिकलो आहे की तुम्ही सर्वांना आनंदी ठेवू शकत नाही. त्यामुळे फक्त संघाच्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.”
हेही वाचा – IND vs AFG : टीम इंडियासह फोटोसेशनला हजर राहण्यासाठी विराटने मारली सुपरमॅनसारखी एन्ट्री, VIDEO होतोय व्हायरल
२२/४, २१२-२१२, १६-१६, १२-१
नाटयमय घडामोडींची रोलरकोस्टर राईड ठरलेल्या लढतीत भारत-अफगाणिस्तान तिसरा ट्वेन्टी-२० सामना आणि सुपर ओव्हर टाय झाली. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये फिरकीपटू रवी बिश्नोईला गोलंदाजी देण्याचा कर्णधार रोहित शर्माचा निर्णय घेतला आणि भारताने विजय साकारला. रोहित शर्माच्या शतकी खेळीला गुलबदीन नईब-मोहम्मद नबी यांनी चोख प्रत्युत्तर दिलं. या विजयासह भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत ३-० असा विजय मिळवला.