विशिष्ट आहार आणि नियमित आहार याच्याआधारेच सचिनने प्रदीर्घ कारकीर्द घडवली, असे उद्गार ज्येष्ठ शरीरसौष्ठवपटू प्रेमचंद डेगरा यांनी काढले. शारीरिक कणखरता हे त्याच्या कारकीर्दीचे वैशिष्टय़ आहे. क्रिकेट हाच त्याचा ध्यास आहे. खेळात अधिकाअधिक सुधारणा घडवणे हेच त्याचे उद्दिष्ट असते. आणि यामुळेच त्याच्या प्रगतीचा आलेख सतत उंचावत राहिला असे त्यांनी सांगितले.
इतकी वर्ष आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट खेळण्यासाठी त्याने आपला आहार आणि व्यायाम याबाबतीत प्रचंड निग्रह बाळगला आहे. शरीराला अपायकारक होईल असा कोणताही आहार तो घेत नाही. त्याचप्रमाणे नियमितपणे र्सवकष व्यायाम करतो. आपल्या शरीराचे म्हणणे तो लक्षपूर्वक ऐकतो. सचिनने जेव्हा खेळायला सुरुवात केली तेव्हा फिटनेसचे आधुनिक तंत्र उपलब्ध नव्हते. मात्र काळानुरुप विकसित झालेल्या फिटनेस तंत्रज्ञानाचा त्याने तंदुरुस्त राहण्यासाठी उपयोग करून घेतला, असे डेगरा यांनी सांगितले.
दुखापती खेळाडूच्या कारकीर्दीचा अविभाज्य घटक आहेत. सचिनने ज्या पद्धतीने प्रत्येक दुखापतीवर मात करत जिद्दीने पुनरागमन केले आहे. दुखापत पूर्ण बरी होण्यासाठी त्याने वेळ घेतला. दुखापत बरी व्हावी यासाठीची आवश्यक काळजी तो घेत असे आणि म्हणूनच असंख्य दुखापतींचा ससेमिरा मागे लागूनही तो कधीही डगमगला नाही, असे डेगरा पुढे म्हणाले.

Story img Loader