आठवडय़ाची मुलाखत
संजय टकले, मोटारस्पोर्ट्सपटू
मोटारस्पोर्ट्स खेळामध्ये मराठी माणसांची उपस्थिती नाममात्र असते. गेली २५ वर्षे बाइक रेसिंग आणि कार रॅलीमध्ये सातत्याने दिमाखदार प्रदर्शन करणारे एक नाव म्हणजे संजय टकले. आशियातील सर्वोत्तम रॅलीपटूंच्या यादीत चौथ्या स्थानी, तर भारतातील अव्वल रॅलीपटू असलेल्या टकले यांनी राजस्थानमध्ये नुकत्याच संपलेल्या मारुती-सुझुकी डेझर्ट स्टॉर्म रॅलीत एक्सप्लोर गटात अव्वल स्थान पटकावले. आशियाई क्रॉसकंट्री रॅलीच्या अजिंक्यपदाचा मान पटकावणारे संजय हे पहिले भारतीय होते. गेल्या वर्षी मलेशियात झालेल्या रॅलीचे जेतेपदही त्यांनी पटकावले होते. हा खेळ महागडा असला तरी तुम्हाला आवड असेल आणि आणि कामगिरीत सातत्य असेल तर यामध्ये तुम्ही सहभागी व्हा, प्रायोजक तुम्हाला नक्कीच मिळतील, असे संजय मराठी मुलांना सांगतात. मोटारस्पोर्टमधील प्रदीर्घ कारकीर्द, अडथळे, अनुभव याविषयी संजय यांच्याशी केलेली बातचीत-
यंदाच्या डेझर्ट स्टॉर्म रॅलीचा अनुभव कसा होता?
डेझर्ट स्टॉर्म ही आव्हानात्मक रॅली आहे. वाळवंटातील चढउतार, उष्ण वातावरण या सगळ्यांवर मात करत वाटचाल करायची असते. यंदा या स्पर्धेत काही बदल करण्यात आले होते. रात्रीच्या वेळेतही एक टप्पा झाला. सतत सहा दिवस प्रदर्शनात सातत्य राखता आले, याचे समाधान आहे. माझ्या यशात माझे नेव्हिगेटर मुस्तफा यांची भूमिकाही महत्त्वाची आहे.
मोटारस्पोर्ट्ससारख्या खेळाकडे कसे वळलात?
पुण्याजवळचे मांजरी हे माझे गाव. वडील शेतकरी आणि घरात मध्यमवर्गीय मराठमोळे वातावरण. मात्र मला लहानपणापासून चक्र-वेग यांची प्रचंड आवड होती. घरच्यांनी कुठलेही काम दिल्यानंतर ते करण्यासाठी मी सायकल मागत असे, जेणेकरून ते काम पूर्ण करण्याच्या निमित्ताने मला वेगाचा अनुभव घेता येईल. सायकलपासून सुरू झालेली आवड नंतर बाइक आणि गाडय़ांमध्ये परावर्तित झाली. टीव्हीवर मोटारस्पोर्ट्स स्पर्धा दाखवण्यात येत असतात, त्यातूनच या खेळाची आवड मनात रुजली. या खेळासंबंधी खूप वाचनही केले आणि वयाच्या १४व्या वर्षी पहिल्यांदा बाइक रॅलीत सहभागी झालो.
मोटारस्पोर्ट्समध्ये प्रचंड धोका आणि अनिश्चितता आहे. तुमच्या आवडीला घरच्यांचा प्रतिसाद कसा होता?
घरच्यांना काळजी वाटणे साहजिक होते. अन्य खेळांमध्ये दुखापतींची शक्यता असते, पण मोटारस्पोर्ट्समध्ये थेट जिवावर बेतू शकते. त्यामुळे सुरुवातीला त्यांचा विरोध होता. रॅलीत सहभागी होण्यापूर्वी मी सखोल अभ्यास करत असे. सुरक्षेच्या नियमांचे मी काटेकोरपणे पालन करत असे. खेळासंबंधीचा माझा निकोप दृष्टिकोन आणि आवड यामुळे घरच्यांचा विरोध हळूहळू मावळला. त्यांच्या भरीव पाठिंब्याच्या जोरावरच ही वाटचाल करू शकलो.
मोटारस्पोर्ट्सची आवड जोपासताना तुम्ही शिक्षण-व्यवसाय यांची सांगड कशी घातली? खेळाच्या सरावासाठी काय सुविधा उपलब्ध होत्या?
मोटारस्पोर्ट्ससाठी मी शिक्षणाशी तडजोड केली नाही. शालेय शिक्षणानंतर मी बी.कॉम. झालो, त्यानंतर विधी क्षेत्रात पदवी मिळवली. यानंतर मी बांधकाम व्यवसाय सुरू केला. मोटारस्पोर्टच्या सरावासाठी अशी कोणतीच व्यवस्था आपल्याकडे उपलब्ध नव्हती. आमच्या घराच्या परिसरातच मी ट्रॅकसदृश रस्ता तयार केला. ही तात्पुरती यंत्रणा होती, पण त्यानिमित्ताने मी थोडासा तरी सराव करत असे. या खेळात जम बसल्यानंतर अव्वल रॅलीपटू करमजित सिंग यांचे मला मार्गदर्शन मिळाले. आता मी सरावासाठी मलेशियाला जातो.
बाइक रेसिंगमध्ये अनेक वर्षे दमदार प्रदर्शनानंतर तुम्ही २००१ मध्ये निवृत्ती पत्करली. यानंतर तुम्ही विश्वभ्रमंती केलीत, या संकल्पनेबद्दल सांगा ?
बाइक रेसिंगमध्ये कारकिर्दीच्या शिखरावर असताना मी निवृत्ती घेतली. यानंतर मी स्वबळावर अनेक देश हिंडलो. या भ्रमंतीमुळे अनुभवाची मोठी शिदोरी मला मिळाली. माणूस म्हणून मी अधिक परिपक्व झालो. नवनवीन प्रदेश पाहिल्यामुळे त्यांची संस्कृती अनुभवता आली. या भ्रमंतीनंतर रॅलीची आवड मला स्वस्थ बसू देईना. म्हणून मी पुन्हा रॅलींकडे वळण्याचा निर्णय घेतला. मात्र या वेळेला चारचाकी गाडय़ांच्या रॅलीत सहभागी झालो.
हा खेळ खर्चिक आहे. यामुळे मराठी मुलं या खेळाचा पर्याय स्वीकारताना दिसत नाहीत, त्याबद्दल काय सांगाल?
या खेळासाठी पैसा लागतो हे सत्य आहे, पण तुम्ही सातत्याने चांगली कामगिरी केलीत तर तुम्हाला प्रायोजक मिळू शकतो. अनेक मराठी मुलांना बाइक्सची-गाडय़ांची आवड आहे. वेगाचे आकर्षण आहे. बेजबाबदारपणे गाडी चालवण्यापेक्षा त्यांनी ही ऊर्जा रॅलीकडे वळवावी.
वेगाची आवड असेल तरच सहभागी व्हा!
आठवडय़ाची मुलाखत संजय टकले, मोटारस्पोर्ट्सपटू मोटारस्पोर्ट्स खेळामध्ये मराठी माणसांची उपस्थिती नाममात्र असते. गेली २५ वर्षे बाइक रेसिंग आणि कार रॅलीमध्ये सातत्याने दिमाखदार प्रदर्शन करणारे एक नाव म्हणजे संजय टकले.
First published on: 25-02-2013 at 02:23 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Speed interest then only participate