भारताला परदेशी धर्तीवर पहिल्यांदा विजयाचे गोंडस, साजेरे रूप दाखवले ते अजित वाडेकर यांनी. १९७१ साली वेस्ट इंडिजला त्यांच्याच मातीत धूळ चारून इतिहास घडवला आणि त्यानंतर साहेबांना त्यांच्याच खेळपट्टय़ांवर चीतपट करत भारतीय क्रिकेटला जागतिक नकाशावर एक नवीन ओळख मिळवून दिली. त्यानंतर १९७२-७३ साली मायदेशातही इंग्लंडच्या संघाला पराभूत करून जोरदार धक्का दिला. सध्या इंग्लंडचा संघ भारतात आला असून हा दौरा सुरू होण्यापूर्वीच बऱ्याच चर्चाना ऊत आला आहे. खासकरून इंग्लंडचे खेळाडू आणि प्रसारमाध्यमे भारतातल्या फिरकी खेळपट्टय़ांबाबत टीका करताना दिसतात. याबाबत वाडेकर म्हणाले की, हा त्यांचा एक बहाणा आहे, ते इथे मालिका हरणार हे त्यांना माहिती असून हा पराभव झाकण्यासाठी ते खेळपट्टीचे कारण आतापासूनच देत आहेत. त्याचबरोबर भारतीय संघ आणि मालिका याबाबत वाडेकर यांनी ‘लोकसत्ता’शी खास बातचीत केली.
वेस्ट इंडिज आणि इंग्लंडला त्यांच्याच माती धूळ चारत तुम्ही ऐतिहासिक विजय नोंदवलात, त्या वेळी नेमकी काय रणनीती तुम्ही आखली होती?
तिथल्या खेळपट्टय़ा कशा आहेत, हे आम्हाला चांगले माहिती होते. त्यामुळे आमची बलस्थाने काय आहेत, याचा विचार केला. आमचे बलस्थान म्हणजे फिरकी गोलंदाजी होती. त्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले. फिरकीपटूंसाठी धावफलकावर जास्त धावा हव्या असायला हव्यात आणि गोलंदाजीवर क्षेत्ररक्षण कमालीचे चांगले असायला हवे, या दोन्ही गोष्टींवर आम्ही लक्ष केंद्रित केले आणि आम्ही त्यामध्ये यशस्वी ठरलो.
तुम्ही इंग्लंडचे बरेच संघ पाहिले आहेत, परंतु सध्याचा इंग्लंडचा तुम्हाला कसा वाटतो ?
इंग्लंडला जेव्हा आम्ही जिंकलो तेव्हाचा संघ हा चांगलाच तगडा होता, कारण त्यांनी अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाला त्यांच्या धर्तीवर पराभूत केले होते. त्यानंतर १९९३च्या वेळी जेव्हा मी संघव्यवस्थापक होतो, तेव्हा ग्रॅहम गूचचा संघ चांगलाच ताकदवान होता. सध्याच्या संघात केव्हिन पीटरसन हा एकमेव चागंला फलंदाज आहे. त्याचा अपवाद सोडल्यास या संघात जास्त अनुभवी खेळाडू नाहीत. १९७१ आणि १९९३चे संघ खरेच तुल्यबळ होते, पण तेवढा हा संघ आहे असे मला वाटत नाही.
भारतातल्या फिरकी खेळपट्टय़ांवर इंग्लंडचे खेळाडू आणि प्रसारमाध्यमे टीका करताना दिसतात, याबद्दल काय वाटते?
आमच्याकडची माती आणि वातावरण फिरकीला पोषक आहे आणि त्यामुळेच आपल्याकडे तशा प्रकारच्या खेळपट्टय़ा आहेत. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिकेत खेळपट्टय़ा वेगवान असतात. खरे तर फिरकी गोलंदाजी त्यांना खेळता येत नाही, त्यामुळे पराभूत झाल्यावर कोणता तरी बहाणा असावा, यासाठी इंग्लंडचे खेळाडू आणि प्रसारमाध्यमे याबाबत टीका करताना दिसत आहेत. ते हरणार तर नक्कीच, पण त्याचे वातावरण ते आत्तापासूनच तयार करताना दिसत आहेत. आम्ही इंग्लंडमध्ये जातो तेव्हा आम्हालाही वेगवान खेळपट्टय़ाच मिळतात, तेव्हा त्यासाठीची तयारी आम्ही करून जातो.
सध्याच्या भारतीय संघाबद्दल काय वाटते?
संघाची चांगली निवड केली गेली आहे. सेहवाग आणि गंभीरसारखे अनुभवी सलामीवीर आपल्याकडे आहेत, त्यांच्याकडून नक्कीच चांगल्या धावा होतील. त्यांनी चांगली सलामी दिली तर मोठी धावसंख्या आपण उभारू शकतो. त्यानंतर मधल्या फळीत सचिनसारखा अनुभवी खेळाडू आहे. युवराज सिंग चांगल्या फॉर्ममध्ये आहे. फलंदाजी आपले बलस्थान आहे. फिरकी गोलंदाजीही चांगली आहे. एक थोडेसे वैविध्य संघात हवा असे वाटते. दोन ऑफ-स्पिनर आणि एक डावखुरा गोलंदाज आपल्या संघात आहेत. पण वैविध्य आणण्यासाठी अमित मिश्रासारखा लेग-स्पिनर संघात असला असता तर विजय पाचऐवजी चार दिवसांमध्ये मिळू शकतो.
या मालिकेबद्दल तुम्हाला काय वाटते?
या मालिकेत पराभवाचा सूड घ्यायचा चांगला योग आपल्याला आलेला आहे आणि सूड नक्कीच आपण घेणार. आपला संघ त्यांच्यापेक्षा उजवा आहे. आपली फलंदाजी चांगली झाली आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षण चांगले झाले तर इंग्लिश संघाला आपण ३-० तर नक्कीच पराभूत करू शकू.
संग्रहित लेख, दिनांक 14th Nov 2012 रोजी प्रकाशित
फिरकी खेळपट्टय़ा हा इंग्लंडचा बहाणा -वाडेकर
भारताला परदेशी धर्तीवर पहिल्यांदा विजयाचे गोंडस, साजेरे रूप दाखवले ते अजित वाडेकर यांनी. १९७१ साली वेस्ट इंडिजला त्यांच्याच मातीत धूळ चारून इतिहास घडवला आणि त्यानंतर साहेबांना त्यांच्याच खेळपट्टय़ांवर चीतपट करत भारतीय क्रिकेटला जागतिक नकाशावर एक नवीन ओळख मिळवून दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 14-11-2012 at 04:04 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Spine ground england team rubbish accuse wadekar