दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फिरकीपटू इम्रान ताहिरने भारतीय क्रिकेट चाहत्यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. तो म्हणाला की, भारताच्या चाहत्यांइतकी क्रिकेटपटू आणि क्रिकेटप्रेमाशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही. इम्रान ताहिरच्या म्हणण्यानुसार, भारतीय चाहते त्यांच्या क्रिकेटर्सना प्रत्येक परिस्थितीत साथ देतात.
आयपीएल सुरू झाल्यापासून जगभरातील खूप क्रिकेटपटू भारतात खेळायला येऊ लागले आहेत. त्याचबरोबर ते चाहत्यांमध्येही खूप लोकप्रिय झाले आहेत. वेगवेगळ्या फ्रँचायझींसाठी खेळल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबाही मिळतो.
इम्रान ताहिर भारतीय चाहत्यांमध्येही खूप लोकप्रिय आहे. तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जसह अनेक संघांसाठी खेळला आहे. त्याने आयपीएलमध्ये एकूण सात हंगाम खेळलेत. त्यामुळेच तो चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. भारतीय चाहत्यांना इम्रान ताहिर खूप आवडतो. इम्रान ताहिर सध्या आंतरराष्ट्रीय लीग टी-२० मध्ये एमआय एमिरेट्सकडून खेळत आहे.
ताहिरने स्पष्ट केले की, क्रिकेट राष्ट्र म्हणून भारताकडे इतर देशाच्या तुलनेत कोणती वेगळी गोष्ट आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना तो म्हणाला, ”जर तुम्ही क्रिकेटर असाल तर तुम्हाला भारतात खेळण्यासाठी एक्सपोजरची गरज नाही. भारतातील क्रिकेटबद्दल चाहत्यांची उत्कटता आणि ते त्याला ज्याप्रकारे पाठिंबा देतात याला उत्तर नाही. सात वर्षे आयपीएलमध्ये खेळणे हा माझ्यासाठी चांगला अनुभव होता. ही माझ्यासाठी खूप सन्मानाची बाब आहे.”
इम्रान ताहिरने आयपीएलमध्ये एकूण ५९ सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने ८२ विकेट घेतल्या आहेत. २०१९ च्या मोसमात त्याने पर्पल कॅपचा पुरस्कारही जिंकला होता. त्याच मोसमात त्याचा संघ चेन्नई सुपर किंग्ज अंतिम फेरीत पोहोचला होता.