चेन्नई : स्टीव्ह स्मिथची गुणवत्ता वादातीत आहे. त्याने फिरकीविरुद्ध धावा करण्यासाठी मार्ग शोधून काढला आहे. मात्र, वर्षानुवर्षे मीसुद्धा त्याच्या फलंदाजीचा अभ्यास केला असून त्याचा बचाव कसा भेदायचा, हे मला माहीत झाले आहे. त्यामुळे आगामी मालिकेत त्याच्याविरुद्ध यशस्वी कामगिरीचा मला विश्वास आहे, असे वक्तव्य भारताचा अनुभवी ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विनने केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर करंडकासाठीच्या पाच सामन्यांच्या कसोटी क्रिकेट मालिकेला २२ नोव्हेंबरपासून पर्थ येथे सुरुवात होणार आहे. या मालिकेत अश्विन आणि स्मिथ यांच्यातील द्वंद्व पाहण्यासारखे असेल. ‘आयपीएल’मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांकडून अश्विन व स्मिथ यापूर्वी एकत्र खेळले आहेत. स्मिथला नेट्समध्ये गोलंदाजी केल्याने त्याच्या योजनांचा अभ्यास करण्याची संधी मिळाल्याचे अश्विन म्हणाला.

‘‘स्मिथ फिरकीविरुद्ध कसा खेळणार हे पाहणे नेहमीच रंजक असते. त्याची खेळण्याची शैली आणि तंत्र इतर फलंदाजांपेक्षा वेगळे आहे. केवळ फिरकीच नाही, तर वेगवान गोलंदाजांविरुद्धही तो वेगळ्या पद्धतीने फलंदाजी करतो. मात्र, विशेषत: फिरकीविरुद्ध खेळताना तो अचूक योजनेसह खेळपट्टीवर उतरतो. त्याने भरपूर सरावही केलेला असतो. त्यामुळे त्याला रोखणे हे आव्हान असते, परंतु वर्षानुवर्षे त्याच्या फलंदाजीचा अभ्यास केल्यानंतर आणि सातत्याने त्याला गोलंदाजी केल्यानंतर, त्याचा बचाव कसा भेदायचा हे मला ठाऊक झाले आहे,’’ असे अश्विनने एका मुलाखतीत सांगितले.

“शरद पवारांचं आयुष्य भूमिका बदलण्यात गेलं”, राज ठाकरेंची सडकून टीका; रिफायनरीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनाही केलं लक्ष्य, म्हणाले…

‘‘दिल्ली कॅपिटल्स आणि पुणे या संघांकडून आम्ही एकत्रित खेळलो आहे. तो कसा सराव करतो आणि त्याला फिरकीविरुद्ध कशाप्रकारे फलंदाजी करायला आवडते, हे मला ठाऊक झाले आहे. याचा निश्चितपणे मला फायदा होत आहे,’’ असेही अश्विन म्हणाला.

सरावाला सुरुवात…

● आगामी बॉर्डर-गावस्कर करंडक कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाने सरावाला सुरुवात केली आहे. भारतीय संघाचे बुधवारी पर्थच्या ‘वॅका’ स्टेडियममध्ये सराव सत्र झाले. या सत्रात अश्विन, विराट कोहली, जसप्रीत बुमरा, रवींद्र जडेजा, केएल राहुल, यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल अशा सर्वच आघाडीच्या खेळाडूंनी सहभाग नोंदवला.

● कर्णधार रोहित शर्माबाबत संभ्रम कायम असून तो अजूनही मुंबईत आहे. त्याने नवी मुंबईच्या रिलायन्स कॉर्पोरेट पार्क येथे बुधवारी सराव केला. मात्र, तो ऑस्ट्रेलियासाठी कधी रवाना होणार आणि २२ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी उपलब्ध असणार का, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

● दरम्यान, भारतीय संघ शुक्रवार ते रविवार या कालावधीत भारत ‘अ’ संघाविरुद्ध सराव करणार आहे. हा सराव पाहण्याची अगदी ‘वॅका’ स्टेडियमच्या दुरुस्तीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही परवानगी नसल्याचा ऑस्ट्रेलियातील प्रसारमाध्यमांचा दावा होता. मात्र, भारतीय संघाने आपले सराव सत्र केवळ या कर्मचाऱ्यांसाठी नाही, तर चाहत्यांसाठीही खुले केले आहे. त्यांना स्टेडियममध्ये उपस्थित राहून हा सराव पाहता येणार आहे.

स्टीव्ह स्मिथ खूप हुशार आहे. प्रतिस्पर्ध्यावर दडपण आणण्याचा त्याचा प्रयत्न असतो. त्याची खेळण्याची शैलीही वेगळी आहे. त्यामुळे त्याला गोलंदाजी करणे हे आव्हान असते. मात्र, ‘आयपीएल’मध्ये आम्ही यापूर्वी एकत्रित खेळल्याने मला नेट्समध्ये त्याच्याविरुद्ध गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. त्यामुळे तो कसा विचार करतो, एखाद्या गोलंदाजाविरुद्ध खेळण्यासाठी कशी तयारी करतो हे कळले. याचा मला निश्चितपणे फायदा झाला आहे. पूर्वी त्याचा बचाव भेदणे मला अवघड जायचे, परंतु आता मला युक्ती ठाऊक झाली आहे. त्यामुळे त्याला रोखण्याचा मला विश्वास आहे. – रविचंद्रन अश्विन.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Spinner r ashwin confident about successful performance in border gavaskar series zws