टीम इंडियाचा दिग्गज ऑफस्पिनर रवीचंद्रन अश्विनने खुलासा केला आहे, की तो २०१८ मध्ये निवृत्ती घेण्याचा विचार करत होता. अश्विन या काळात खराब फॉर्मशी झुंज देत होता आणि त्यावेळी त्याच्या मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही. अश्विनला त्या काळात सहा चेंडू टाकल्यावरच थकवा जाणवायचा आणि त्याला आता विश्रांतीची गरज आहे असे वाटायचे. मात्र, यानंतर त्याने शानदार पुनरागमन करत टी-२० विश्वचषकात भारतीय संघातही स्थान मिळवले. आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेतही त्याचा भारतीय संघात समावेश होऊ शकतो.
अश्विन हा कसोटीतील टीम इंडियाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. भारताचा मुख्य फिरकी गोलंदाज असण्यासोबतच अश्विनने अनेक वेळा बॅटनेही दमदार कामगिरी केली आहे आणि भारतासाठी सामने जिंकले आहेत. ईएसपीएन क्रिकइन्फोशी केलेल्या संभाषणात अश्विनने सांगितले, ”२०१८ ते २०२० या कालावधीत अनेक वेळा त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार केला. या सर्व काळात मी सतत चांगले करण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु गोष्टी कठीण होत होत्या. सहा चेंडू टाकल्यावर मला दम लागत होता, संपूर्ण शरीर थकले होते. गुडघेदुखी वाढली की मी लहान उडी मारून गोलंदाजी करायचो.”
अश्विनने असेही सांगितले, ”खेळाडू माझ्या दुखापतीबद्दल संवेदनशील नव्हते आणि कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही. भारतीय संघातील अनेक खेळाडूंवर विश्वास व्यक्त करण्यात आला, मात्र असे घडले नाही. मी संघासाठी अनेक सामने जिंकले आहेत, पण माझ्यावर विश्वास ठेवला गेला नाही,” असे अश्विन म्हणाला.
वडिलांचे म्हणणे खरे ठरले
अश्विनने सांगितले, ”२०१८ मध्ये जेव्हा मी पुन्हा दुखापतग्रस्त झालो, तेव्हा मी अनेकदा निवृत्ती घेण्याचा विचार केला. यावेळी मी केवळ पत्नीशीच बोलत असे. माझ्या वडिलांना विश्वास होता की एक दिवस त्यांचा मुलगा एकदिवसीय आणि टी-२० संघात परत येईल आणि मृत्यूपूर्वी ते पाहू शकेल. त्याच्यासाठी ही खूप वैयक्तिक गोष्ट होती.”
हेही वाचा – OMG..! क्रिकेटपटू आणि त्याचं ‘खास’ बॉलिवूड कनेक्शन; ‘ही’ अभिनेत्री तर सचिनसाठी झाली होती वेडी!
अश्विनचा २०२१ च्या टी-२० विश्वचषक संघात समावेश करण्यात आला आणि येथे चमकदार कामगिरी केल्यानंतर टी-२० संघात पुनरागमन केले. आता त्याला आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेतही भारतीय संघात संधी दिली जाऊ शकते.