‘‘मला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायला आवडते, कारण शाब्दिक चकमकींशिवाय ते फार काळ राहू शकत नाहीत. मलाही या चकमकींचा त्रास होत नाही, उलट चांगले खेळण्यासाठी प्रोत्साहनच मिळते. ऑस्ट्रेलियाच्या संघातील काही जण माझे मित्र आहेत. अनेकांबाबत मला आदर आहे. माझी कदर नसलेल्या कोणाबाबतही मला आदर नाही,’’ अशी परखड भूमिका शतकवीर विराट कोहलीने व्यक्त केली. मिचेल जॉन्सनशी उडालेल्या खटक्यासंदर्भात विराट बोलत होता.
‘‘मी इथे क्रिकेट खेळायला आलो आहे, कुणाचा आदर कमावण्यासाठी नाही. मी धावा करत आहे, त्यावर मी समाधानी आहे. मी त्यांच्याशी वाद घालून वातावरण बिघडवत असल्याची टीका ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी केली. कदाचित मी तसाच आहे. तुम्ही माझा दु:स्वास करता आणि तेच मला आवडते. शाब्दिक चकमकीचे मला वावडे नाही, त्याने मला स्फुरण चढते,’’ असे कोहलीने सांगितले.
तो पुढे म्हणाला, ‘‘अजिंक्यने दिमाखदार खेळी केली. ज्या पद्धतीने आम्ही ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येला प्रत्युत्तर दिले आहे ते अभिमानास्पद आहे. मोठी खेळी करण्यात मला अपयश येते अशी टीका होते. या खेळीत शतकानंतर संयमाने खेळ करण्याचा मी प्रयत्न केला.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा