“खेळामध्ये जग बदलण्याची शक्ती आहे. लोकांचे मनोमीलन साधण्याची अणि त्यांना संघटित करण्याची ताकद आहे. अंधकार आणि नैराश्याने ग्रासलेल्या वातावरणात आशा निर्माण करण्याचे काम खेळाद्वारे होते.”
नेल्सन मंडेला
दक्षिण आफ्रिकेच्या वर्णभेदीविरोधी लढय़ाचे अध्वर्यु नेल्सन मंडेला यांचे हे उद्गार खेळाविषयीचा त्यांचा अभ्यास किती दांडगा आहे, हे स्पष्ट करतात. स्वत: बॉक्सिंगपटू असलेले मंडेला राजकीय आणि सामाजिक वर्तुळात वावरले, मात्र समाजरचनेत खेळांचे असलेले महत्त्व त्यांनी ओळखले होते. म्हणूनच मदिबा ऊर्फ मंडेला यांच्या निधनाचे वृत्त पसरताच क्रीडाविश्वाने त्यांना आदरांजली वाहिली. क्रीडा संघटना आणि राजकारणी हे समीकरण आता खेळाच्या विकासासाठी मारक समजले जाते, मात्र मंडेला त्याला अपवाद होते आणि इथेच त्यांचे वेगळेपण जाणून येते. खेळ म्हणजे पैसा, प्रसिद्धी, मनोरंजन अशी संस्कृती आता जगभर रूढ होते आहे, मात्र मंडेला यांनी खेळाच्यापल्याड जाऊन विचार केला. वर्ण, रंग अशा पातळ्यांवर दुभंगलेल्या दक्षिण आफ्रिकेतील समाजाला एकत्रित आणण्यासाठी खेळ हे सुयोग्य माध्यम असल्याचे त्यांनी जाणले. खेळाला सामाजिक अभिसरणाचे प्रारूप देण्याचे द्रष्टेपण त्यांनी बिंबवले. म्हणूनच मंडेला गेल्यावर क्रिकेटपासून ते रग्बीपर्यंत आणि फुटबॉलपासून ते अॅथलेटिक्सपर्यंत खेळाडूंना, संघटकांना आपला माणूस गमावल्याचे दु:ख झाले.
खेळाच्या सर्वसमावेशक स्वरूपाविषयी मंडेलांनी आपल्या आत्मचरित्रात विस्ताराने लिहिले आहे. ते म्हणतात, ‘‘बॉक्सिंगच्या रिंगमध्ये प्रवेश केल्यानंतर मानांकन, वय, रंग, पैसा हे सगळं गौण ठरते. जेव्हा तुम्ही प्रतिस्पध्र्याचा अंदाज घेत असता, त्याची ताकद अजमावत असता, त्याचे कच्चे दुवे हेरत असता, त्यावेळी त्याच्या त्वचेचा रंग, त्याचा सामाजिक स्तर या गोष्टींचा आपण विचारही करत नाही’’.
वर्णभेदविरोधी लढा संपल्यानंतर १९९१ साली वीस वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेटविश्वात पुनरागमन झाले. वर्षभरातच ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये क्रिकेट विश्वचषकाचे आयोजन होणार होते. मुख्य प्रवाहापासून दूर गेलेल्या दक्षिण आफ्रिकेला या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत स्थान मिळणे कठीण होते. मात्र नेल्सन मंडेला यांनी विविध प्रशासकीय आघाडय़ांवर समर्थपणे बाजू मांडली आणि दक्षिण आफ्रिकेला विश्वचषकात खेळण्याची संधी मिळाली. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट व्यवस्थेत ‘कोटा सिस्टीम’ राबवण्यामागचा विचार मंडेला यांचाच. खेळामध्ये गुणवत्तेला न्याय मिळावा, आरक्षण कशाला अशी जोरदार टीका विविध स्तरांतून झाली. मात्र दक्षिण आफ्रिकेतील सामाजिक संरचना लक्षात घेता, ही पद्धत राबवणे योग्य होते. प्रस्थापित व्यवस्थेतील त्रुटी दूर करून सुधारणा करण्याचे धाडस त्यांनी दाखवले आणि या भूमिकेमुळेच दक्षिण आफ्रिकेला मखाया एन्टिनी, अॅश्वेल प्रिन्स, हाशिम अमला असे गुणवान क्रिकेटपटू लाभले. क्रिकेट विश्वचषकाचे आयोजन म्हणजे महाकाय शिवधनुष्य पेलणे. आर्थिक भार, पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था आणि असंख्य गोष्टींचीजुळवाजुळव. दक्षिण आफ्रिका या सगळ्यासाठी तयार असल्याचा विश्वास मंडेला यांनी जागतिक स्तरावरील क्रिकेट प्रशासकांना दिला आणि दक्षिण आफ्रिकेला विश्वचषकाचे आयोजन करण्याची संधी मिळाली. दिमाखदार, नेटक्या स्पर्धेच्या आयोजनाने समस्त दक्षिण आफ्रिकावासीयांनी जगभरातल्या क्रिकेटरसिकांची मने जिंकली.
‘मकाना फुटबॉल असोसिएशन’ ही मंडेला यांच्या विचारातून स्थापना झालेली फुटबॉल संघटना. रॉबेन आयलंडमधील तुरुंगातील संघांचा समावेश असलेली ही संघटना होती. एखादा खेळ विकसित होण्यासाठी त्याला संघटनात्मक बैठक देणे अत्यावश्यक आहे हे ओळखून त्यांनी ही रचना केली. दक्षिण आफ्रिकेत या खेळाची नव्याने रुजवात करण्याचे श्रेय मंडेलांना जाते. २००६मध्ये फुटबॉल विश्वचषकाच्या आयोजनाचे माप आफ्रिकेच्या पदरात पडले नाही, मात्र मंडेला यांनी प्रयत्न सोडले नाहीत. चिकाटीने त्यांनी राजकीय आणि सामाजिक सामर्थ्यांचा सकारात्मक उपयोग करून घेतला आणि २०१०चा फिफा फुटबॉल विश्वचषक दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर अवतरला.
स्प्रिंगबोक रग्बी संघ ही मंडेला यांची आणखी एक सुरेख खेळी. गौरवर्णीयांच्या वर्चस्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या या संघाचा कारभार त्यांनी आपल्याकडे घेतला. संथ परंतु नियमित वेगाने वाटचाल करत त्यांनी रग्बीच्या मैदानावर चमत्कारच घडवला. १९९५ साली दक्षिण आफ्रिकेने रग्बी विश्वचषक पटकावला आणि मंडेलांचे प्रयत्न सार्थकी लागले.
खेळ म्हणजे उत्साह, जल्लोष, आनंद. आयुष्याची २७ वर्षे तुरुंगात व्यतीत करणारा माणूस आत्मकेंद्री, घुमा, एककल्ली होण्याचीच शक्यता अधिक, परंतु मंडेला या अनुभवाने अंतर्मुख झाले. इतक्या वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर बदललेल्या परिस्थितीचा अभ्यास करून त्यांनी खेळाद्वारे सामाजिक बदलाची संकल्पना रुजवली, राबवली. म्हणूनच बाजारू, सवंगतेकडे झुकणाऱ्या क्रीडाविश्वाला मंडेलारूपी क्रीडादूताच्या निधनाने पोकळी जाणवणे साहजिक आहे.
क्रीडादूत
"खेळामध्ये जग बदलण्याची शक्ती आहे. लोकांचे मनोमीलन साधण्याची अणि त्यांना संघटित करण्याची ताकद आहे.
First published on: 08-12-2013 at 04:26 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sport nelson mandelas vehicle for change