महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचे मत

प्रशांत केणी, मुंबई</strong>

देशातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये क्रीडा हा विषय अनिवार्य हवा. अन्य तासिकांप्रमाणेच किमान अर्धा तास खेळायचाही हवा. शिक्षकांनाही तो तास बंधनकारक करायला हवा, असे मत महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने व्यक्त केले.

देशात आदर्श क्रीडापटू घडवण्याच्या उद्देशाने सचिनने तेंडुलकर-मिडलसेक्स ग्लोबल अकादमीच्या माध्यमातून प्रारंभ केला आहे. निरोगी आणि तंदुरुस्त भारत घडवणे, हे माझे स्वप्न आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने ही जबाबदारी स्वीकारण्याची आवश्यकता आहे. लहान मुलापासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाला तंदुरुस्तीचे महत्त्व पटायला हवे, असे सचिनने सांगितले. अकादमीची निर्मिती आणि उद्देशाबाबत सचिनशी केलेली खास बातचीत-

* तेंडुलकर-मिडलसेक्स ग्लोबल अकादमी ही पारंपरिक उपक्रमांच्या पलीकडे जाणारी आहे. याबाबत काय सांगशील?

फक्त उत्तम क्रिकेटचे मार्गदर्शन करणे, एवढाच यामागील हेतू नाही, तर योग्य भावनेने खेळायला त्यांना शिकवायचे आहे. क्रिकेटपटू म्हणून कारकीर्द संपल्यानंतर पुढे काय? तुझ्या निवृत्तीनंतरसुद्धा सर्वाचे तुझ्याविषयीचे प्रेम कायम राहायला हवे, ही शिकवण माझ्या वडिलांकडून मला मिळाली आहे. हेच मला अधिक महत्त्वाचे वाटते.

bउत्तम नागरिक होण्यासाठी त्यांना मूल्यांची जाणीव असणे महत्त्वाचे असते. कोणत्याही व्यक्तीला कुटुंबाकडून योग्य संस्कार मिळतात. हे संस्कार मैदानावर आणि मैदानाबाहेरसुद्धा दिसायला हवेत. हाच अकादमीचा प्रमुख हेतू आहे.

* अकादमीच्या पुढील शिबिरांविषयी काय सांगशील?

मुंबईत डी. वाय. पाटील स्टेडियम आणि एमआयजी क्लब येथे ही दोन शिबिरे नोव्हेंबरमध्ये होणार आहेत. त्यानंतर पुण्याच्या दी बिशप्स स्कूलमध्ये दोन शिबिरे होणार आहेत. ७ ते १२ आणि १३ ते १८ वर्षे असे दोन वयोगट तयार करण्यात आले असून, तळागाळातल्या मुलांनासुद्धा मोफत मार्गदर्शन केले जाणार आहे.

* इंग्लंडमध्ये सरावाला आणि खेळायला तुला अतिशय आवडते. त्यामुळेच मिडलसेक्सची निवड केली का?

सरावाला आणि खेळायला मला कुठेही आवडते. हो, पण इंग्लंड दौऱ्यावर मी नेहमी काही दिवस आधी जायचो, तेथील वातावरणाशी समरस होण्यासाठी चांगला सराव करायचो. मिडलसेक्स कौंटी संघाशी करार करण्याचा उद्देश हा आहे की, त्यांच्याकडे १५६ वर्षांचा अनुभव आहे. क्रिकेटमध्ये चांगल्या भागीदारीसाठी जोडीदारसुद्धा तगडा असावा लागतो. ही अकादमी फक्त क्रिकेटपुरती मर्यादित नसून, अन्य खेळांकडे आणि मुले-मुली दोघांसाठी कार्यरत असेल. जगभरात या अकादमीच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहोत.

* निवृत्तीनंतर पाच वर्षे आता झाली. देशातील क्रीडाक्षेत्राचे तू कसे विश्लेषण करशील?

देशातील क्रीडाक्षेत्र वेगाने विकसित होत आहे. खेळाडूला पूरक वातावरणनिर्मिती आता उपलब्ध आहे. देशातील प्रत्येक नागरिकाने खेळायला हवे, असे मला वाटते. या प्रत्येकाने खेळाडूच व्हायला पाहिजे, असा त्याचा अर्थ नाही. समृद्ध नागरिक घडवणे, हा त्यामागील हेतू आहे. पदकांच्या दृष्टीने विचार केल्यास भारतात खेळाडूच्या दृष्टीने योग्य वातावरण आहे. चांगले प्रशिक्षण आणि व्यावसायिक दृष्टिकोन आता मिळू लागल्याने पदकांमध्ये आता भर पडू लागली आहे. हे सुखद चित्र समाधान देणारे आहे.