ऑलिम्पिक पदक विजेता बॉक्सर विजेंदरसिंग याच्या मागची साडेसाती अद्याप संपलेली नाही. राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरात त्याने वाढीव सुट्टीकरिता दिलेला अर्ज भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साई)अद्याप मंजूर केलेला नाही. अमली पदार्थाचा व्यापारी अनूपसिंग कहलान याच्याशी त्याचे संबंध असल्याचा आरोप पंजाब पोलिसांनी केला आहे, तसेच त्याने डिसेंबर २०१२ व फेब्रुवारी २०१३ या कालावधीत बारा वेळा हेरॉइन घेतल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.  साईच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, विजेंदर याने राष्ट्रीय शिबिरातून सध्या सुट्टी घेतली असून गेल्या गुरुवारी तो शिबिरात दाखल होणार होता मात्र तो अद्याप तेथे आलेला नाही. त्याने वाढीव सुट्टीचा अर्ज दिला आहे. राष्ट्रीय क्रीडा शिक्षण संस्थेच्या (एनआयएस) पदाधिकाऱ्यांमार्फत त्याने तीन वेळा सुट्टी वाढविली असल्याचा अर्ज दिला आहे. त्याने आणखी दोन आठवडे वाढीव सुट्टी देण्याबाबत अर्ज दिला आहे. एनआयएसने त्याचा हा अर्ज साईकडे पाठविला आहे.  
भारतीय हौशी बॉक्सिंग महासंघाचे अध्यक्ष अभिषेक मटोरिया यांनी सांगितले, विजेंदरला राष्ट्रीय शिबिरातून बडतर्फ करण्याचा अद्याप निर्णय घेतलेला नाही. राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक समिती ज्या ज्या वेळी वैद्यकीय तपासणीचा आग्रह धरेल, त्या त्या वेळी विजेंदरने त्याकरिता सहकार्य केले पाहिजे. विजेंदरची सुट्टी मंजूर होईल अशी मला खात्री आहे.

Story img Loader