सुटलो एकदाचे! पाच कसोटींचा स्विंग दहशतवाद संपला. आपण धार्मिक दहशतवाद, जातीय दहशतवाद पाहिला आहे, सहन केला आहे, पण इंग्लंडमध्ये भारतीय फलंदाजांनी जो स्विंग दहशतवाद सहन केला, त्यामुळे त्यांच्या उरल्यासुरल्या आत्मविश्वासाच्या चिंध्या झाल्या. प्रत्येक बॉल अचूक टप्प्यावर न हाताळता येणाऱ्या वेगाबरोबर दोन्ही दिशेला होणारा लेट स्विंग. अफगाणिस्तानात तालिबानी लोक गुन्हेगारांना डोक्याला बंदूक लावून थोडा वेळ चालत नेतात आणि मग काम तमाम करतात ते व्हिडिओ इंटरनेटवर पाहायला मिळतात. त्यामध्ये त्या गुन्हेगारांचा चेहरा कसा भेदरलेला दिसतो तसाच कोहली, गंभीर, विजय, पुजारा, रहाणे यांचा दिसला. पर्याय दिला असता तर हे लोक बॅटिंगला जायच्या ऐवजी स्टेडियममधून पळत सुटले असते. इतके भयग्रस्त, पराभूत चेहरे क्वचितच पाहायला मिळतील. स्विंगची इतकी दहशत अँडरसन आणि ब्रॉडने निर्माण केली की आपल्या फलंदाजांनी शस्त्रे टाकून दिली. गुडघे टेकले, नाक घासले, कृपा करा पण बॉल टाकू नका, अशी लाचार विनवणी केली. कुठल्याही स्वाभिमानी देशाला असे पानिपत उद्ध्वस्त करून टाकेल.
खरंच स्विंग गोलंदाजीला उत्तर नसतं का? असतं की. एकमेव उत्तर आहे सराव. वेग, बाऊन्स यापेक्षा खतरनाक असतो स्विंग. धवन, गंभीर यांनी या लेग स्टम्पकडून ऑफ स्टम्पकडे जाणाऱ्या बॉलवर विकेट टाकल्या. कोहली, पुजारा, रहाणे, विजय यांनी ऑफ स्टम्पच्या बाहेरच्या बॉलशी नियमित छेडछाड केली हे कशाचे द्योतक आहे? स्विंग कव्हर करून खेळायचे कौशल्य आत्मसात केलेले नाही. वास्तविक अँडरसन आणि ब्रॉड यांच्या बॉलच्या सीम पोजिशनवरून बॉलची दिशा कळत असणारच. कमी काय पडले तर शेवटच्या क्षणी घ्यायचा निर्णय आणि त्याप्रमाणे स्विंग कव्हर करण्याचे तंत्र. हे तंत्र अशक्य नाही. आफ्रिकेत स्टेनसमोर आपण उत्तम खेळलो होतो. बॉल निग्रहाने सोडले होते. इंग्लंडमध्ये शेवटच्या तीन कसोटीत सगळे कोलमडले. खूप दिवस चालणाऱ्या परीक्षा शेवटी शेवटी सहनशीलतेची परीक्षा घेतात. आपले फलंदाज त्यात नापास झाले. स्विंग खेळायचे कौशल्य आणि निग्रह तासन्तास सरावाने आत्मसात होते. आपण किती सराव केला होता? सरावाविना कसोटी सामना खेळायचा? मैफल म्हणजेच रियाजाचे माध्यम असण्याकरिता प्रत्येक जण भीमसेन नसतो. आयपीएल संपल्यावर बरेच स्टार खेळाडू मौजमस्तीत मश्गूल झाले. टुकार बांगलादेश दौऱ्यावर एक दिवसाच्या मालिकेला दुसऱ्या फळीचा संघ फेरफटका मारून आला. इंग्लंड दौरा तोंडाशी आला म्हटल्यावर द्रविडला बोलव वगैरे परीक्षेच्या आधीची एकवीस अपेक्षितं झाली. एवढय़ा सोयी, सरावाच्या उत्तम व्यवस्था असून, खेळाडू करतात काय? नॅशनल क्रिकेट अॅकॅडमीचा माजी प्रशिक्षक मंदार दळवीशी मी बोललो. तो म्हणाला, ‘आजकाल जास्त स्विंग होणारे बॉल्ससुद्धा तयार होतात. कोणी फलंदाज सराव करायचा म्हणाला तर त्याला पिकअप करणं, अॅकॅडमीत सोडणं, रात्री तीन वाजता पण सरावाची व्यवस्था करणं, उत्तम सोयी देणं सर्व केलं जातं, पण तासन्तास सराव कोण करणार?’
धोनीने आयपीएलचा मत्सर करू नका वगैरे उपदेश केला. आयपीएल आणि कसोटी संघ वेगळे ठेवण्याची गरज आहे. ज्यांना शंभर मीटरची रेस पळायची आहे, त्यांना वेगळे करा. ज्यांना मॅरेथॉन पळायची आहे त्यांना वेगळे काढा. स्विंग गोलंदाजीला पोषक वातावरण कुठे आहे अशी ठिकाणे शोधून तिथे सराव आणि सामने होऊ द्या. धर्मशाला, श्रीनगर अशा ठिकाणी सराव सामने होणे गरजेचे आहे. या उपर सगळय़ात महत्त्वाचे म्हणजे कसोटीतील यशापयश खेळाडू आत्मसन्मानाशी जोडणार का? नसतील तर क्रिकेट फक्त मनोरंजनाचे साधन होईल. कसोटी क्रिकेट हा गंभीर विषय आहे. जरी तो खेळ असला तरी!
– रवि पत्की
sachoten@hotmail.com
BLOG : स्विंग दहशतवादाचे बिच्चारे बळी
सुटलो एकदाचे! पाच कसोटींचा स्विंग दहशतवाद संपला. आपण धार्मिक दहशतवाद, जातीय दहशतवाद पाहिला आहे, सहन केला आहे, पण इंग्लंडमध्ये भारतीय फलंदाजांनी जो स्विंग दहशतवाद सहन केला, त्यामुळे त्यांच्या उरल्यासुरल्या आत्मविश्वासाच्या चिंध्या झाल्या.
First published on: 21-08-2014 at 01:15 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sports blog by ravi patki on team india tour to england