हॅमिल्टनचे सलग दुसरे जेतेपद
मनामा : मर्सिडिझच्या लुईस हॅमिल्टनने नाटय़मय रंगलेल्या बहारिन ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीत सर्व प्रतिस्पध्र्याना मागे टाकत जेतेपदाला गवसणी घातली. सलग दुसऱ्यांदा मर्सिडिझच्या दोन्ही ड्रायव्हर्सनी पहिले, दुसरे स्थान पटकावले. हॅमिल्टनचे हे सलग दुसरे जेतेपद ठरले. निको रोसबर्गने दुसरे स्थान प्राप्त केले. सहारा फोर्स इंडियासाठी रविवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. सर्जीओ पेरेझने तिसरे स्थान पटकावले. २००८मध्ये पदार्पण केल्यानंतर फोर्स इंडियाच्या ड्रायव्हर्सनी पहिल्यांदा अंतिम तीन जणांमध्ये स्थान मिळवण्याची करामत केली. त्याचा सहकारी निको हल्केनबर्ग पाचवा आला. रेड बुलच्या डॅनिअल रिकार्डिओने चौथे स्थान मिळवले.

बॅडमिंटनपटूंना दोन महिने विश्रांती
नवी दिल्ली : जागतिक बॅडमिंटन महासंघाने जागतिक स्तरावरील अव्वल दर्जाच्या खेळाडूंना दोन महिने विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढील वर्षी जागतिक सुपर सीरिज स्पर्धाना ऑल इंग्लंड स्पर्धेने प्रारंभ होईल. ऑल इंग्लंड स्पर्धा ३ ते ८ मार्च दरम्यान होणार आहे. दरवर्षी जानेवारीत होणाऱ्या कोरिया ओपन व मलेशियन ओपन स्पर्धा यापुढे ऑल इंग्लंड स्पर्धेनंतर घेतल्या जातील. जागतिक बॅडमिंटन महासंघाचे सरचिटणीस थॉमस लुएन्द म्हणाले, ‘‘डिसेंबरमध्ये दरवर्षी दुबई येथे जागतिक सुपरसीरिज स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेनंतर दीड-दोन महिने विश्रांती मिळावी अशी विनंती अव्वल दर्जाच्या अनेक खेळाडूंनी केली होती. त्यांची ही विनंती मान्य करण्यात आली आहे.’’

चोंग वुई ली, शिझियान वँग विजेते
नवी दिल्ली : अग्रमानांकित चोंग वुई ली  व द्वितीय मानांकित शिझियान वँग यांनी इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील अनुक्रमे पुरुष व महिला एकेरीचे विजेतेपद मिळविले. अव्वल मानांकित वुई ली याने द्वितीय मानांकित चेन लाँग याच्यावर २१-१३, २१-१७ असा सरळ दोन गेम्समध्ये विजय मिळवला. महिलांच्या एकेरीत द्वितीय मानांकित शिझियानने अव्वल मानांकित लि झुरेई हिच्यावर २२-२०, २१-१९ असा रोमहर्षक विजय मिळविला.

मावळी मंडळ कबड्डी स्पर्धा
मुंबई : ठाणे येथील श्री मावळी मंडळ संस्थेच्या वतीने शिवजयंती उत्सवानिमित्त ६३व्या पुरुष आणि महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २७ एप्रिल ते १ मेदरम्यान मंडळाच्या मैदानावर ही स्पर्धा रंगणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना दीड लाख रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. इच्छुक संघांसाठी प्रवेश अर्ज मावळी मंडळ कार्यालय, मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन आणि मुंबई शहर कबड्डी असोसिएशन येथे मिळतील. प्रवेशअर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख १८ एप्रिल आहे.

डी. वाय. पाटीलला चौथ्यांदा जेतेपद
मुंबई : राकेश प्रभू आणि अभय वाघमारेची सुरेख गोलंदाजी तसेच विनीत इंदुलकर (नाबाद ५५) व योगेश पवार (३५) यांची उपयुक्त सलामी या जोरावर डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमीने मुंबई पोलीस जिमखान्याचा नऊ विकेट्सनी पराभव करत प्रबोधन मुंबई ट्वेन्टी-२० स्पर्धेचे चौथ्यांदा जेतेपद पटकावले. मुंबई पोलीस जिमखान्याला ९ बाद १२० धावांवर रोखल्यानंतर डी. वाय. पाटील अकादमीने हे आव्हान एक बळी गमावून पूर्ण केले. विजेत्या संघाने या मोसमातील मुंबईतील सर्व ट्वेन्टी-२० स्पर्धा जिंकून एक वेगळाच विक्रम प्रस्थापित केला.

गोरेगाव येथे उन्हाळी क्रीडा शिबीर
मुंबई : गोरेगाव जिमखान्यातर्फे जयप्रकाश नगर, गोरेगाव (पूर्व) येथे मुलामुलींसाठी विविध क्रीडा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. १४ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या या  शिबिरात बुद्धिबळ, मल्लखांब, कराटे आणि टेबल टेनिस या खेळांविषयी मार्गदर्शन मिळणार आहे. हे शिबीर २४ मेपर्यंत चालणार असून अधिक माहितीसाठी संध्याकाळी ६ ते ९ या वेळेत २६८६२५६९ किंवा ८८७९५०५१४४ या क्रमांकांवर संपर्क करावा.