मुंबई : चिकित्सक पत्रकारिता व विश्लेषणात्मक लेखनशैलीचा आयाम मराठी क्रीडा पत्रकारितेमध्ये रुजवणारे आणि मराठी दैनिकांमध्ये क्रीडा पान ही संकल्पना प्रथम राबवणारे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार, संपादक, समीक्षक आणि लोकप्रिय समालोचक विष्णू विश्वनाथ तथा वि. वि. करमरकर यांचे सोमवारी मुंबईत अंधेरी येथे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. करमरकर अविवाहित होते. काही महिने ते आजारी होते. गेल्या आठवडय़ात प्रकृती खालावल्याने त्यांना खासगी शुश्रुषागृहात दाखल करण्यात आले. तेथे सोमवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. करमरकर यांच्या पार्थिवावर अंधेरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
करमरकर यांच्या निधनाने राज्यातील क्रीडा क्षेत्राचा आणि खेळाडूंचा ज्येष्ठ मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. १९६०च्या आधी मराठी दैनिकांमध्ये खेळांच्या बातम्यांना प्रमुख स्थान नव्हते. ते करमरकर यांनी मिळवून दिले. १९६२मध्ये ‘महाराष्ट्र टाइम्स’ हे दैनिक सुरू झाल्यानंतर या दैनिकाच्या पहिल्या चमूमध्ये करमरकर यांचा सहभाग होता. द्वा. भ. कर्णिक संपादक असलेल्या या दैनिकात सुरुवातीला आधी दोन कॉलममध्ये क्रीडा जगताच्या बातम्या येत असत. करमरकर यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे कालांतराने संपूर्ण पान खेळांच्या पानाला मिळाले. खेळांची आवड असणाऱ्या पत्रकारांना यामुळे पूर्ण वेळ नोकऱ्या उपलब्ध झाल्या. परिणामी खेळ, खेळाडू, संस्था, क्रीडा संघटक आणि कार्यकर्ते यांच्या सततच्या प्रयत्नांची धडपड ठळकपणे लोकांसमोर आली. या सर्वाचे निर्माते करमरकर असल्याने ते क्रीडा पानाचे जनक म्हणून ओळखले गेले.
करमरकर मुळचे नाशिकचे. त्यांचे वडील डॉक्टर होते. आपल्या मुलानेसुद्धा डॉक्टर व्हावे अशी त्यांची इच्छा होती. पण, अर्थशास्त्रात एम. ए. करत असताना करमरकरांनी क्रीडा पत्रकारितेची वेगळी वाट निवडली. इंग्रजी वर्तमानपत्रात खेळांच्या बातम्या मोठय़ा संख्येने असत. मात्र, मराठीतही हा प्रयोग राबवला पाहिजे, यासाठी त्यांनी आपली लेखणी प्रभावी आणि प्रवाहीपणे चालवली. यासाठी त्यांना द्वा.भ.कर्णिक यांच्याप्रमाणे गोविंद तळवलकर या ज्येष्ठ संपादकांचा भक्कम पाठिंबा मिळाला.
समाजवादी विचारांच्या जडणघडणीत तयार झालेल्या करमरकर यांनी आपल्या उभ्या आयुष्यात सतत पारदर्शक कारभाराचा आणि चिकित्सेचा आग्रह धरला. नकली प्रसिद्धी आणि संवगतेच्या मागे न जाता जे पायाभूत असेल त्याची कास धरली पाहिजे, यावर त्यांचा कायम भर राहिला. त्यांच्या लिखाणामधून हेच सतत समोर येत राहिले. मुख्य म्हणजे क्रीडा संस्था, कार्यकर्ते आणि खेळाडू यांनी याच वाटेवरून पुढे जायला हवे, याविषयी ते आग्रही असत. परिणामी राज्यभरात ताकदीच्या क्रीडा संघटना आणि कार्यकर्ते तयार झाले. क्रिकेटसोबत खो-खो, कबड्डी, कुस्ती या देशी खेळांना आंतरराष्ट्रीय करण्यात त्या-त्या संस्थांसह करमरकर यांच्या मार्गदर्शक लेखणीचा खूप मोठा वाटा आहे.
सुरेश कलमाडींसारख्या राजकीय दृष्टय़ा वजनदार क्रीडा संघटकांची पत्रास करमरकर यांनी कधी बाळगली नाही. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळय़ावर त्यांनी भरभरून लिहिले. पनवेलमध्ये दहाएक देशांना गोळा करून कबड्डीचा विश्वचषक भरवणाऱ्या मंडळींवरही त्यांनी यथेच्छ टीका केली. करमरकरांच्या या अनेक गुणांमुळे ते स्वत: एक चालतीबोलती संस्था बनून गेले. त्यांच्या निधनाने क्रीडा पत्रकारितेतीलच नव्हे, तर क्रीडा क्षेत्रातील एका युगाचा अंत झाला, अशी भावना म्हणूनच व्यक्त होत आहे.
करमरकर सरांच्या टीकेतही मार्गदर्शनाचा दृष्टिकोन!
खेळाला वर्तमानपत्रात हक्काची जागा मिळवून देण्याचे खरे श्रेय हे वि. वि. करमरकर सरांना जाते. खेळ आणि खेळाडूचा विकास हेच त्यांचे ध्येय होते. ते क्रीडा पत्रकारच नाही, तर मार्गदर्शकच होते. सरांनी कायम टीका केली असे म्हटले जाते, पण त्यांच्या टीकेत मार्गदर्शनाचा दृष्टिकोन होता. त्यांची टीका कधीही एकसुरी वाटली नाही. एखाद्या घटनेवर टीका केली आणि त्यानुसार निर्णय झाला, तर त्याचे कौतुकही करताना सर सर्वात पुढे असायचे.
एखाद्या खेळाची किंवा खेळाडूविषयी बातमी देताना ती सोप्या शब्दात मांडायची ही त्यांची हातोटी होती. विशेष म्हणजे ही बातमी अशी का लिहिली, हे सर खेळाडूलाही समजावून सांगायचे. त्यामुळे खेळाडूंच्या मनात त्यांच्याबद्दल कायम आदरच राहिला. सरांनी खरीखुरी पत्रकारिता केली. त्यांची टीका बोचरी वाटायची; पण त्यामागे मार्गदर्शकाचा दृष्टिकोन असायचा. मला चांगले आठवते, जुलै १९७४ मध्ये पतियाळा येथे राष्ट्रीय खो-खो स्पर्धा होती. त्या स्पर्धेसाठी प्रथमच माझ्यावर महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपविण्यात आली होती. तेव्हा या निर्णयाविरुद्ध सरांनी आवाज उठवला होता. आपल्या लेखणीने हा निर्णय कसा चुकीचा होता, संघात अनेक वरिष्ठ खेळाडू असताना श्रीरंगची कर्णधारपदी कशी नियुक्ती होते हे त्यांनी लिहिले होते. स्पर्धा संपली. महाराष्ट्राने विजेतेपद मिळविले. त्या वेळी प्रवासाच्या सुविधा तेवढय़ा नव्हत्या. मुंबईत येऊनच आम्हाला पुण्याला जायचे होते. साधारण रात्री १०.३० वाजता आम्ही मुंबईत पोहोचलो होतो. इतक्या रात्रीही सर आमच्या स्वागतासाठी उपस्थित होते आणि पुढे येऊन त्यांनी माझ्या पाठीवर थाप मारली. चांगला खेळलास आणि संघाचेही चांगले नेतृत्व केलेस, असे त्यांनी सांगितले. माझ्यासाठी विजेतेपदापेक्षाही सरांची शाबासकी सर्वात मोठे पारितोषिक होते.
अष्टपैलू व्यक्तिमत्त्व!
वि. वि. करमरकर यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात ७०च्या दशकात केली. त्या वेळी भारतात खेळांना फारसे महत्त्व दिले जात नव्हते. वृत्तपत्रांमध्येही क्वचित क्रीडाच्या बातम्या असायच्या. मात्र, करमरकर यांच्या प्रयत्नांमुळे ‘महाराष्ट्र टाइम्स’ या दैनिकात खेळांच्या बातम्यांसाठी स्वतंत्र पान मिळाले. दैनिकांमध्ये क्रीडाला अखेरचे पान द्यायचे ही करमरकर यांचीच संकल्पना होती. त्यांनी हे सर्व कसे जुळवून आणले हे त्यांनाच ठाऊक. त्यांच्यामध्ये प्रचंड चिकाटी आणि आत्मविश्वास होता.
करमरकर यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी जर ठरवले असते, तर ते राजकीय विश्लेषक आणि पत्रकार म्हणूनही कारकीर्द घडवू शकले असते. त्यांचा सर्वच विषयांवरील अभ्यास दांडगा होता. मात्र, त्यांना सर्वाधिक रस हा खेळांमध्ये होता. ते अधिकाधिक खेळाडू आणि संघटकाची भेट घेत. त्यांच्याकडून विविध गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करत. कोणताही खेळ असो, त्यातील नवनव्या नियमांचीही त्यांना पूर्ण माहिती असायची.
आजकाल काहीही दावे-प्रतिदावे केले जातात. मात्र, क्रीडा क्षेत्रात असा दावा केल्याचे त्यांना आढळल्यास ते त्याची खोलवर जाऊन चौकशी करत. त्यांची अभ्यासूवृत्ती हे त्यांचे वेगळेपण होते. ते क्रिकेटचे समालोचनही करायचे. त्यांनी ‘ऑल इंडिया रेडियो’वर माझीही मुलाखत घेतली होती. तसेच ते खेळाडूंबाबत विचारपूस करत. ते बुद्धिबळाबाबत कायम माझ्याशी चर्चा करायचे. विश्वनाथन आनंद जगज्जेता बनू शकतो, असे मी करमरकर यांना सांगितले. मी स्वत: आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. मात्र, मला जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीपर्यंत पोहोचता आले नाही; परंतु आनंद ही कामगिरी करेल असा मला विश्वास होता. मी तसे करमरकर यांना सांगितले. त्यांनी मला विविध प्रश्न विचारले. आमची बरीच चर्चा झाली.
तसेच शासकीय नियमांचे पालन न करता दिले गेलेले पुरस्कार याविरुद्ध त्यांनी नेहमीच आवाज उठवला. आता माध्यमांकडून पुरस्कारांना फारसे महत्त्व दिले जात नाही. मात्र, पूर्वी करमरकर यांनी सरकारला अनेकदा नियम बदलायला लावले. क्रीडा क्षेत्र भ्रष्टाचारमुक्त राहावे आणि संघटनांमध्ये गैरव्यवहार होऊ नयेत, यासाठी त्यांनी कायम प्रयत्न केले, आवाज उठवला, मते मांडली. त्यांनी खेळांव्यतिरिक्त कशालाही महत्त्व दिले नाही. त्यांच्यासारखा पत्रकार मी याआधी पाहिला नाही आणि पुन्हा होणे नाही.
सडेतोड लेखन करणारे पत्रकार. नेहमी खऱ्याचीच बाजू घेतली. आपल्या मताने जर कुणाचा रोष ओढावला तरी त्याला ते जुमानत नसत. आपल्या मुद्यावर ते ठाम असायचे. एखादा मुद्दा धरला, की त्याचा निर्णय लागेपर्यंत ते पाठपुरावा करत. खेळावर त्यांचे प्रेम होते. खेळाविषयी त्यांची येणारी मते ही अभ्यासपूर्ण आणि खेळाला उंचावणारीच होती.
– चंदू बोर्डे, माजी कसोटीपटू
अत्यंत निर्भिडपणे आपली मते मांडणारे आणि त्यावर ठाम राहणारे अशी करमरकर सरांची ओळख होती. कबड्डी, कुस्ती, खो-खो या भारतीय खेळांचे ते खरे प्रसारक होते. त्यांच्या लेखणीने अनेक खेळाडूंना सन्मान मिळवून दिला. खेळाडूंच्या पाठिशी भक्कमपणे उभा राहणारा पत्रकार म्हणून त्यांची ओळख होती. त्यामुळेच प्रत्येक खेळाडूबरोबर त्यांचे जिव्हाळय़ाचे संबंध होते.
– शांताराम जाधव, अर्जुन पुरस्कार विजेते कबड्डीपटू
खेळाडूंवर प्रेम करणारे आणि त्यांची बाजू घेऊन प्रशासनाची कान उघडणी करणारे टीकाकार म्हणून करमरकरांची ओळख होती. त्यांची मते परखड आणि टीका बोचणारी असायची. पण, त्यामागे खेळाची सुधारणा व्हावी हा एकमेव हेतू असायचा. त्यांची लेखणी तिखट असली, तरी त्यांचा स्वभाव प्रेमळ होता.
– राजू भावसार, अर्जुन पुरस्कार विजेते कबड्डीपटू
ज्येष्ठ क्रीडा समीक्षक, पत्रकार वि. वि.करमरकर यांचे दु:खद निधन झाले. क्रीडा जगताला वृत्तपत्रात हक्काचे स्थान मिळवून देणारे क्रीडा पृष्ठाचे जनक करमरकर यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्राचे अतोनात नुकसान झाले आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो. भावपूर्ण श्रद्धांजली!
– एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
करमरकर यांनी लोकांमध्ये खेळाविषयी प्रेम निर्माण व्हावे यादृष्टीने विविध उपक्रम राबवले. खेळ हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असला पाहिजे, यासाठी ते आग्रही होते. त्यांच्या प्रेरणेनेच मराठी दैनिकांत क्रीडा पान सुरू झाले. त्यांच्या निधनाने एक नवा प्रवाह सुरू करणारा पत्रकार आपण गमावला.