नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताच्या वुशू संघातील अरुणाचल प्रदेशाच्या तीन महिला खेळाडूंना मान्यता नाकारण्याच्या चीनच्या आडमुठेपणाचा भारताने तीव्र निषेध केला असून, क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी या कारणाने स्पर्धेसाठी चीनला जाण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
ईशान्य भारताकडील अरुणाचल प्रदेशाच्या न्यामन वांगसू, ओनिलू टेगा आणि मेपुंग लामगू या वुशू क्रीडा प्रकारातील तीन महिला खेळाडूंना चीनने प्रवेशपत्रिका नाकारली आहे. अरुणाचल प्रदेश हा चीनचा भाग असल्याचे दाखवून चीनने या खेळाडूंना मान्यता नाकारल्याचे समोर येत आहे.
आशियाई ऑलिम्पिक समितीचे हंगामी अध्यक्ष रणधीर सिंग यांनी या विषयात लक्ष घातले असून, ऑलिम्पिक समिती म्हणून जे काही करता येईल ते सगळे प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
हेही वाचा >>> अरुणाचल प्रदेशच्या खेळाडूंना चीनचा मज्जाव!
दोन्ही देशांच्या हितसंबंधाचे रक्षण करण्यासाठी आम्ही योग्य उपाययोजना अवलंबू असे भारत सरकारने चीनला रोख-ठोक उत्तर दिले आहे. ‘‘अरुणाचल प्रदेश हा भारताचा भाग आहे आणि राहणार यात शंकाच नाही. चीनची ही कृती चुकीची असून, निषेध म्हणून आपण आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी चीनला जाणार नाही,’’ असे अनुराग ठाकूर यांनी स्पष्ट केले.
अरुणाचल प्रदेशा येथील खासदार किरेन रिजिजू यांनी चीनची कृती ही खेळभावना आणि अशियाई खेळांचे आयोजन करण्यासाठी असलेल्या नियमांचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. ‘‘अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे. अरुणाचल प्रदेशातील जनता ही चीन करत असलेल्या दाव्याला विरोध करत आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने या बेकायदेशीर कृतीबाबत चीनला जाब विचारावा,’’ असेही रिजिजू यांनी म्हटले आहे.
हेही वाचा >>> आशियाई क्रीडा स्पर्धाना आजपासून प्रारंभ; भारताचे शंभरी पार करण्याचे लक्ष्य!
दरम्यान, ऑलिम्पिक आशियाई समितीच्या नितिमत्ता समितीचे अध्यक्ष वेई जिझोंग यांनी आम्ही प्रत्येक भारतीय खेळाडूला ‘व्हिसा’ मंजूर केला आहे. कोणाचाही ‘व्हिसा’ चीनने नाकारलेला नाही. आशियाई स्पर्धेसाठी येणाऱ्या प्रत्येकाला परवानगी देण्याचा करार यापूर्वीच करण्यात आला आहे. त्यामुळे या तीन खेळाडूंना ‘व्हिसा’ नाकारला असे म्हणता येणार नाही, असे सांगितले.
मान्यता नाकारलेल्या खेळाडूंची कुटुंबीयांना चिंता
स्पर्धेसाठी व्हिसा नाकारण्यात आलेल्या खेळाडूंच्या मानसिक स्थितीबाबत त्यांच्या पालकांनी चिंता व्यक्त केली आहे. मेपुंग लामगू या खेळाडूचा भाऊ गांधी लामगूने ही चिंता व्यक्त केली आहे. पेशाने डॉक्टर असलेल्या गांधी लामगूने मान्यता नाकारण्यात आल्यानंतर बहिणीशी आपले बोलणेच झाले नसल्याचे सांगितले. इतरांकडे चौकशी केली असता, ती तेव्हापासून रडत असल्याचे समजले. अशा स्थितीत तिने काही वेडेवाकडे पाऊल उचलू नये अशी भीतीही त्याने व्यक्त केली आहे.