पुढील वर्षी होणाऱ्या राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धाच्या भारतीय खेळाडूंच्या तयारीबाबत क्रीडामंत्री जितेंद्र सिंग यांनी नरजी व्यक्त केली आहे. केंद्रीय क्रीडामंत्री जितेंद्र सिंग यांनी भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) पदाधिकाऱ्यांची ५ ऑगस्ट रोजी बैठक बोलावली होती. राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर क्रीडामंत्र्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे नाराजीचा सूर होता.
या बैठकीत मोजक्याच राष्ट्रीय क्रीडा महासंघांनी पदकाची आशा असलेल्या खेळाडूंच्या तयारीबाबतची सविस्तर माहिती सादर केली होती. क्रीडामंत्र्यांनी ‘साई’च्या पदाधिकाऱ्यांना बऱ्याच सूचना करून क्रीडा सचिव पी. के. देब यांच्या अध्यक्षतेखाली आढावा समिती नेमण्याचे आदेशही दिले. ‘‘प्रत्येक क्रीडा प्रकारासाठी मुख्य प्रशिक्षक आणि सहयोगी कर्मचारी नेमण्याचे आदेश क्रीडामंत्र्यांनी दिले आहेत. आढावा समिती स्थापन केल्यानंतर त्या समितीने दर आठवडय़ाला बैठक बोलावून प्रत्येक खेळातील खेळाडूंच्या तयारीचा आढावा घेतला पाहिजे. राष्ट्रकुल स्पर्धेपर्यंत त्यात खंड पडायला नको. अव्वल खेळाडूंना अद्ययावत प्रशिक्षणाची गरज भासल्यास, त्यांना राष्ट्रीय क्रीडा संघटनांमार्फत निधी पुरवला जाईल, अशा सूचना क्रीडामंत्री जितेंद्र सिंग यांनी दिले आहेत,’’ असे क्रीडा मंत्रालयाच्या पत्रकात म्हटले आहे.
खेळाडूंना प्रशिक्षणासाठी किती खर्च येईल, याबाबतही क्रीडामंत्र्यांनी चर्चा केली. ‘‘खेळाडूंच्या प्रशिक्षणाचा खर्च उचलणे, हे क्रीडा मंत्रालयाचे प्रथम प्राधान्य असेल. राष्ट्रकुल स्पर्धेतून तिरंदाजी आणि कुस्ती हे क्रीडाप्रकार वगळण्यात आल्याने जितेंद्र सिंग यांनी नाराजी व्यक्त केली. २०१० राष्ट्रकुल स्पर्धेत मिळवलेल्या पदकांपैकी ३० टक्के पदके भारताने कुस्ती, तिरंदाजी आणि सांघिक नेमबाजीत पटकावली होती. त्यामुळे हे प्रकरण राष्ट्रकुल स्पर्धेच्या सचिवांपर्यंत पोहोचवण्याचे आदेश जितेंद्र सिंग यांनी पी. के. देब यांना दिले आहेत,’’ असेही पत्रकात म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sports minister dissatisfied with cwg asian games preparations