नवी दिल्ली : पॅराअ‍ॅथलिट्सना देण्यात येणाऱ्या रोख बक्षिसांच्या धोरणात क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी बदल केला असून त्यांना आता मायदेशात परतल्यानंतर लगेचच बक्षिसांची रक्कम दिली जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत १२ पदके मिळवणाऱ्या पॅरा-बॅडमिंटनपटूंचा बुधवारी क्रीडामंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी खेळाडूंना १ कोटी ८२ लाख रुपयांचे रोख इनाम देण्यात आले. ‘‘पॅरा-बॅडमिंटनपटूंनी देशाचे नाव उंचावले आहे, त्यामुळे त्यांचा सत्कार झालाच पाहिजे. यापुढे सर्व अ‍ॅथलिट्सचा अशाच प्रकारे सन्मान केला जाईल,’’ असे क्रीडामंत्र्यांनी सांगितले.

नुकत्याच झालेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत १२ पदकांची कमाई करणाऱ्या भारतीय पॅरा-बॅडमिंटन संघाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रशंसा केली आहे. भारताने या स्पर्धेत तीन सुवर्णपदकांसह १२ पदके पटकावली. ‘‘भारतीय पॅरा-बॅडमिंटन पथकाचा अभिमान १३० कोटी भारतीयांना वाटत आहे. संपूर्ण संघाला माझ्याकडून शुभेच्छा. त्यांची कामगिरी अत्यंत प्रेरणादायी  आहे,’’ असे ट्वीट पंतप्रधानांनी केले आहे.

पंतप्रधान मोदीजी, आम्हाला भेट कधी?

कांस्यपदक विजेता पॅरा-बॅडमिंटनपटू सुकांत कदम याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्वीट करत आम्हाला भेट कधी मिळणार, अशी विचारणा केली आहे. ‘‘सन्माननीय, नरेंद्र मोदी सर, भारताच्या पॅरा-बॅडमिंटनपटूंनी जागतिक पॅरा-बॅडमिंटन स्पर्धेत १२ पदकांची कमाई केली आहे. आम्हालाही तुमचे आशीर्वाद हवे आहेत. तुम्हाला भेटण्याची संधी मिळावी, अशी विनंती आम्ही करत आहोत. आशियाई क्रीडा स्पर्धेनंतर तुम्हाला भेटण्याची संधी हुकली होती,’’ असे ट्वीट सुकांत कदमने केले आहे. त्यानंतरही पंतप्रधानांनी ट्विट करत या खेळाडूंची प्रशंसा केली आहे.