अखेर थाळीफेकपटू कृष्णा पुनियाची थाळी रिकामीच राहणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने देशातील क्रीडा क्षेत्राचे सर्वोच्च पुरस्कार जाहीर करताना आपल्या पुरस्कार विजेत्यांच्या मूळ यादीवरच ठाम राहणे पसंत केले आहे. याचप्रमाणे मंत्रालयाने हा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम २९ ऑगस्टला होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. केंद्रीय क्रीडामंत्री जितेंद्र सिंग अनुपलब्ध असल्यामुळे हा कार्यक्रम आता ३१ ऑगस्टला होणार आहे.
हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांचा जन्मदिन २९ ऑगस्ट हा देशभरात ‘राष्ट्रीय क्रीडादिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. याच दिवशी सर्व सरकारी क्रीडा पुरस्कारांचे वितरण करण्याची प्रथा आहे. ‘‘जितेंद्र सिंग यांनी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेत्यांच्या फायलीला अंतिम स्वरूप दिले आहे. खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार विजेत्यांच्या मूळ यादीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पुरस्कार समितीने केलेल्या शिफारसींवरच आम्ही ठाम राहिलो आहोत,’’ असे क्रीडा सचिव पी. के. देब यांनी सांगितले.
पुनिया आणि लंडनच्या पॅराऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारा एच. एन. गिरिशा यांनी आपले नाव डावलण्यात आल्याबद्दल जितेंद्र सिंग यांची भेट घेतली त्यामुळे पुरस्कार विजेत्यांची नावे घोषित करण्यास उशीर झाला, असे देब यांनी यावेळी सांगितले. पूर्वनियोजित यादीनुसार, विश्वचषक विजेता नेमबाज रंजन सांधीला खेलरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे. याचप्रमाणे क्रिकेटपटू विराट कोहली, अॅथलेटिक्सपटू रणजित महेश्वरी, बुद्धिबळपटू अभिजीत गुप्तासह १५ जणांचे नावे अर्जुन पुरस्कारासाठी निश्चित करण्यात आली आहेत.
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेत्यांची यादी
राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार : रंजन सोधी
अर्जुन पुरस्कार :
चेक्रोव्होलू स्वुरो (तिरंदाजी), रणजित महेश्वरी (अॅथलेटिक्स), पी. व्ही. सिंधू (बॅडमिंटन), कविता चहल (बॉक्सिंग), रुपेश शाह (बिलियर्ड्स आणि स्नूकर), विराट कोहली (क्रिकेट), अभिजीत गुप्ता (बुद्धिबळ), गगन जीत भुल्लर (गोल्फ), साबा अंजूम (हॉकी), राजकुमारी राठोर (नेमबाजी), जोशना चिनप्पा (स्क्वॉश), मौमा दास (टेबल टेनिस), नेहा राठी (कुस्ती), धमेंद्र दलाल (कुस्ती), अमितकुमार सरोहा (पॅराअॅथलेटिक्स).
द्रोणाचार्य पुरस्कार :
पूर्णिमा महातो (तिरंदाजी), महावीर सिंग (बॉक्सिंग), नरिंदरसिंग सैनी (हॉकी), पी. थॉमस (अॅथलेटिक्स), राज सिंग (कुस्ती).
ध्यानचंद पुरस्कार :
मेरी डि’सुझा सिक्वेरा (अॅथलेटिक्स), सईद अली (हॉकी), अनिल मन (कुस्ती), गिराज सिंग (अपंगांच्या स्पर्धा).
राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार :
समाजातील खेळ हेरणे आणि युवा गुणवत्ता विकास : डॉ. यु. के. मिश्रा, राष्ट्रीय क्रीडा अकादमीचे संस्थापक आणि अध्यक्ष
क्रीडा क्षेत्रासाठी आर्थिक साहाय्य : सेनादल क्रीडा नियंत्रण मंडळ
क्रीडा मार्गदर्शन आणि व्यवस्थापन : पुलेला गोपीचंद यांची हैदराबादस्थित अकादमी
क्रीडापटूंसाठी नोकऱ्या आणि कल्याण कार्य : पेट्रोलियम क्रीडा मंडळ
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा