मुंबई हॉकी असोसिएशनच्या (एमएचए) भाडेकरारावरून सुरू असलेला वाद.. मुंबई हॉकीची होत असलेली प्रतारणा.. आणि हॉकी खेळाडूंना डावलून एमएचएवर काही कुटुंबाची चाललेली एकाधिकारशाही राजवट.. या सर्वाचा हॉकीवर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळेच प्रस्तापित गटाविरोधात माजी ऑलिम्पिकपटूंनी ‘प्लेअर्स पॅनल’ची स्थापना करून मोट बांधली आहे. मुंबई हॉकीचे संपूर्ण नुकसान होण्याआधी राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी प्रकरणाकडे लक्ष घालावे असे आवाहन प्लेअर्स पॅनलकडून करण्यात आले आहे.
‘‘मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) निवडणुकीत क्रीडामंत्री जातीने हजर होते. एमसीएच्या शेजारीच एमएचएचे कार्यालय आणि स्टेडियम आहे. त्याकडेही त्यांनी लक्ष द्यावे. प्रस्तापित गटाने मुंबई हॉकी संपविण्याचा विडा घेतला आहे आणि त्यापासून त्यांना रोखणे आवश्यक आहे. तावडेंनी आणि सरकारने याकडे दुर्लक्ष केल्यास आम्ही शिवछत्रपती पुरस्कार परत देऊ,’’ असा इशारा प्लेअर्स पॅनलच्या सदस्यांनी दिला आहे. बुधवारी १२ ऑगस्ट रोजी होणाऱ्या एमएचएच्या निवडणुकीत ‘खेळाडू विरुद्ध प्रस्तापित’ अशी लढाई सुरू आहे. प्रस्तापित गटाने मुंबई हॉकीला अधोगतीकडे नेल्याचा आरोप करत ऑलिम्पिकपटूंनी त्यांच्याविरोधात दंड थोपटण्याचा निर्णय घेतला आहे.
या पॅनलमध्ये ऑलिम्पिकपटू जोकीम काव्र्हालो, गॅव्हीन फेरेरा, माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू सतिंदर सिंग वालिया, रमेश पिल्ले आणि आंतरराष्ट्रीय महिला खेळाडू नीना राणे या शिवछत्रपती पुरस्कारविजेत्या खेळाडूंचा समावेश आहे. यांच्यासह या पॅनलला माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि शिवछत्रपती पुरस्कारविजेत्या धनराज पिल्ले यांचाही पाठिंबा आहे. सचिवपदासाठी उभे राहिलेले माजी ऑलिम्पिकपटू आणि हॉकी प्रशिक्षक जोकीम काव्र्हालो म्हणाले की, ‘‘बक्षी आणि राम सिंग राठोड यांनी खेळाडूंना सदस्यत्व न देता घरच्यांना एमएचएचे सदस्य बनवले आहे. १५० खेळाडूंनी सदस्यत्वासाठी अर्ज केले होते, परंतु त्यापैकी केवळ १४ जणांनाच सदस्य बनविण्यात आले. उर्वरित सदस्यत्व कुटुंबातील प्रत्येकाला देण्यात आले. एमएचएचा कारभार सध्या काही कुटुंबे चालवत आहेत आणि त्याचा खेळाडूंना फटका बसतोय. गेल्या सहा महिन्यांत एकही बैठक झालेली नाही. अनेक आर्थिक घोटाळेही झाले.’’
क्रीडामंत्र्यांनी हॉकीकडेही लक्ष द्यावे!
मुंबई हॉकी असोसिएशनच्या (एमएचए) भाडेकरारावरून सुरू असलेला वाद.. मुंबई हॉकीची होत असलेली प्रतारणा.. आणि हॉकी खेळाडूंना डावलून एमएचएवर काही कुटुंबाची चाललेली एकाधिकारशाही राजवट..
First published on: 09-08-2015 at 03:33 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sports minister should give attention to hockey