आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने बंदी घातलेल्या भारतीय हौशी बॉक्सिंग महासंघाला (आयएबीएफ) आणखी एक ठोसा बसला आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने या संघटनेची संलग्नता काढून घेतली आहे.
मंत्रालयातील एका जबाबदार अधिकाऱ्याने याबाबत सांगितले,की आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने (एआयबीएफ) या संघटनेवर बंदी घातली आहे. तसेच संघटनेसंदर्भातील अन्य सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करुनच आम्ही संलग्नता काढून घेण्याची अंमलबजावणी लगेचच केली आहे. त्यामुळे या संघटनेला शासनाकडून कोणत्याही सवलती किंवा सुविधा मिळणार नाहीत.
या संघटनेवर मंत्रालयाने डिसेंबर २०१२ मध्ये तात्पुरती बंदी घातली होती व संघटनेला राष्ट्रीय क्रीडा नियमावलीनुसार निवडणुका घेण्याचा आदेश दिला होता. स्वतंत्र निवडणुक अधिकाऱ्याची नियुक्ती करीत या निवडणुका घेतल्या जाण्याची अपेक्षा होती. एआयबीएनेदेखील या संघटनेला निवडणुका घेण्याचा तगादा लावला होता. मात्र मंत्रालय किंवा एआयबीए यांच्यापैकी कोणाचेच आदेश आयएबीएफने पाळले नाही.
कोणत्याही खेळाच्या राष्ट्रीय संघटनेस संलग्नता देताना या संघटनेचे कायदेशीर अस्तित्व, आंतरराष्ट्रीय महासंघाची मान्यता, भारतीय ऑलिम्पिक महासंघाची मान्यता, पारदर्शी कारभार, लोकशाही पद्धतीने झालेल्या निवडणुका आदी सर्व गोष्टींचा विचार केला जातो. तसेच, राष्ट्रीय स्तरावरील संघटनेत दोन गट असू नयेत, एकच संघटना कार्यरत असावी अशीही शासनाची अपेक्षा असते. मात्र आयएबीएफने या अटी पाळल्या नसल्यामुळे शासनाने त्यांची संलग्नता काढून घेतली आहे असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

Story img Loader