रिओ ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू सुशील कुमार सहभागी होणार की नरसिंग यादव, या वादापासून क्रीडा मंत्रालयाने दूर राहणेच पसंत केले
आहे. सुशील आणि नरसिंग यांच्याबाबतच्या वादात आम्ही पडू इच्छित नाही. या प्रकरणाचा
छडा भारतीय कुस्ती महासंघाने लावायला हवा, असे मत केंद्रीय क्रीडामंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी व्यक्त केले.
विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील ७४ किलो वजनी गटामध्ये नरसिंगने भारतासाठी ऑलिम्पिक कोटा मिळवला होता, पण दोन ऑलिम्पिक पदके देशाला जिंकवून देणारा सुशील कुमार खांद्याच्या दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळू शकला नाही. त्यामुळे या गटात भारताला एक स्थान मिळाले असून नरसिंग आणि सुशील यांच्यापैकी कोणता कुस्तीपटू ऑलिम्पिकला जाणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.
‘‘माझ्या मते याबाबतचा निर्णय महासंघाने घ्यायचा आहे. आम्ही त्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. त्यामुळे याबाबतचा निर्णय घेण्याची जबाबदारी महासंघाचीच आहे,’’ असे सोनोवाल म्हणाले.
विश्व अजिंक्यपद स्पर्धेत नरसिंगने कांस्यपदक पटकावले असले तरी त्याला ऑलिम्पिकमध्ये एकही पदक पटकावता आलेले नाही. दुसरीकडे सुशीलने ६६ किलो वजनी गटामध्ये भारताला दोन पदके मिळवून दिली आहेत.
लंडन ऑलिम्पिकमध्ये नरसिंग आणि सुशील वेगवेगळ्या गटांमधून खेळले होते, पण ६६ किलो वजनी गटातून बाहेर पडत सुशीलने ७४ किलो वजनी गटात खेळायला सुरुवात केली. आता ऑलिम्पिकला या दोघांपैकी कोण जाणाऱ, याचा निर्णय भारतीय कुस्ती महासंघाला घ्यायचा आहे. त्यांनी हा निर्णय लांबणीवर ढकलल्यामुळे बऱ्याच वादांना, अफवांना तोंड फुटले आहे.
याबाबत भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे (आयओए) सचिव राकेश गुप्ता यांनी म्हटले आहे की, ‘‘कुस्ती महासंघाने ऑलिम्पिक प्रक्रियेसाठी पाठवण्यात आलेल्या संभाव्य यादीमध्ये सुशीलचे नाव नोंदवलेले नाही, पण त्याचे नाव यानंतरही नोंदवता येऊ शकते.’’ गुप्ता पुढे म्हणाले की, ‘‘बुधवारी बबिता आणि रविंदर खत्री हे ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले. त्यांचे नाव कुस्ती महासंघाने पाठवलेल्या यादीत नव्हते. याचा अर्थ असा होत नाही की, हे दोघे ऑलिम्पिकला जाणार नाहीत. जर एखादा खेळाडू महिन्याभरानंतर ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला तरीही त्याला रिओला जाता येऊ शकते. जर महासंघाला वाटत असेल
की अनुभवी सुशीलने ऑलिम्पिकला जावे, तर ते तसा निर्णय घेऊ शकतात.’’

Story img Loader