राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकीची अधिकृत संघटना कोणती, या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला. क्रीडा मंत्रालयाने हॉकी इंडियाला राष्ट्रीय क्रीडा संघटनेचा दर्जा दिला आहे. त्यामुळेच हॉकी इंडिया हीच आता देशातील हॉकीची राष्ट्रीय संघटना म्हणून ओळखली जाणार आहे. या निर्णयाद्वारे क्रीडा मंत्रालयाने प्रतिस्पर्धी भारतीय हॉकी महासंघाला (आयएचएफ) दणका दिला आहे.
मंत्रालयाने २८ फेब्रुवारी रोजी हॉकी इंडियाला याबाबत पत्र पाठविले आहे. त्यामध्ये हॉकी इंडिया हीच अधिकृत राष्ट्रीय संघटना असल्याचे त्यांनी कळविले आहे, असे बात्रा यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, ‘‘आमच्या संघटनेसाठी ही अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे. हे ध्येय साकार करण्यासाठी खेळाडू व प्रशिक्षकांनी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे. देशात हॉकीला गतवैभव पुन्हा मिळवून देण्याचे आमचे मुख्य ध्येय आहे. आता भारतीय हॉकी संघाला ऑलिम्पिक स्पर्धेत व जागतिक स्तरावर चांगली कामगिरी करून अव्वल स्थान मिळवून देण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी आम्ही अतोनात प्रयत्न करणार आहोत.’’
कोणत्याही संघटनेला राष्ट्रीय संघटनेचा दर्जा मिळण्यासाठी त्याला संबंधित खेळाच्या आंतरराष्ट्रीय महासंघाची तसेच भारतीय ऑलिम्पिक महासंघाची (आयओए) मान्यता आवश्यक असते. हॉकी इंडियाला २००९ मध्ये आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ व आशियाई हॉकी महासंघ यांची मान्यता मिळाली होती. आयओएच्या संलग्नतेचे निकषही त्यांनी पूर्ण केले होते व आयओएनेही त्यांना मान्यता दिली होती. हॉकी इंडियाने गेल्या तीन-चार वर्षांमध्ये ऑलिम्पिक पात्रता फेरी, जागतिक हॉकी लीगचे यशस्वी संयोजन केले आहे. भारतात कनिष्ठ जागतिक लीग अंतिम फेरी (२०१५), वरिष्ठ जागतिक लीग अंतिम फेरी (२०१७), पुरुषांची वरिष्ठ विश्वचषक स्पर्धा (२०१८) आदी आंतरराष्ट्रीय स्पर्धाचेही आयोजन केले जाणार आहे. या स्पर्धाचे संयोजन हॉकी इंडियातर्फेच केले जाणार आहे.
हॉकी इंडियाशी २७ संलग्न सदस्य, १९ सहयोगी सदस्य व दोन राज्य ऑलिम्पिक संघटना संलग्न आहेत. २०११ पासून वरिष्ठ पुरुष व महिला, कनिष्ठ पुरुष व महिला, सबज्युनिअर मुले व मुली या गटाच्या राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा