भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांच्यांवर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. महिला पहिलवानांनी हे आरोप केले आहेत. तसेच, बृजभूषण सिंह यांच्याविरोधात दिल्लीच्या जंतर-मंतरवर कुस्तीपटू विनेश फोगाटसह अन्य महिला पहिलवान आंदोलनाला बसले होते. यानंतर एकच खळबळ उडाली आहे. याची गंभीर दखल आता केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने घेतली आहे.
भारतीय क्रीडा प्राधिकरणाने सांगितल्यानुसार, “ऑलम्पिक आणि कॉमनवेल्थ गेम पदक विजेत्यांसह कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांवर ७२ तासांत उत्तर द्यावे. असं निर्देश केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघाला दिले आहेत. तसेच, लखनऊ येथील १८ जानेवारीपासून सुरु होणार महिला राष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण शिबिर रद्द करण्यात आलं आहे. या शिबिरात ४१ पहिलवान १३ प्रशिक्षक सहभागी होणार होते,” अशी माहिती भारतीय क्रीडा प्राधिकरणाने दिली.
“कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांनी…”
विनेश फोगाटने म्हटलं की, “प्रशिक्षक महिलांना त्रास देत आहेत. महासंघाचे काही प्रशिक्षक महिला प्रशिक्षकांनाही असभ्यतेने वागवतात. ते महिला खेळाडूंना त्रास देतात. भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांनीही अनेक मुलींचं लैंगिक शोषण केलं आहे,” असा आरोप विनेश फोगाटने बृजभूषण सिंह यांच्यावर केला.
‘महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण आणि…’; Brij Bhushan Sharan Singh यांच्यावर Vinesh Phogatचे गंभीर आरोप
“ते आमच्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप करतात आणि त्रास देतात. आमचं शोषण करत आहेत. आम्ही ऑल्मपिक खेळण्यासाठी जातो, तेव्हा आमच्याकडे ना फिजिओ ना प्रशिक्षक असतो. आम्ही आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांनी आम्हाला धमकावणं सुरु केलं,” असेही विनेश फोगाट म्हणाली.