खेळून दमल्यानंतर थकवा घालवण्यासाठी घेतलेला चहा किंवा खेळण्याआधी ताजेतवाने वाटण्यासाठी प्यायलेली कॉफी खेळाडूंसाठी धोक्याची ठरू शकते. जागतिक उत्तेजक विरोधी संस्था अर्थात वाडाने कॅफिन हा घटक असणाऱ्या चहा आणि कॉफीला अधिकृतरित्या उत्तेजकांच्या यादीत मांडलेले नाही, परंतु खेळाडूंद्वारे या घटकांच्या सेवनाकडेही ‘वाडा’चे लक्ष असणार आहे.
उत्तेजकांच्या यादीत गणती झालेली नसली तरी ‘वाडा’ची कॅफिनप्रमाणेच निकोटिन घटक असलेल्या पदार्थाच्या सेवनावरही बारीक नजर असणार आहे. सामान्यत: धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींच्या शरीरात हे द्रव्य मिळू शकते. ब्युप्रोपिऑन, कॅफिन, निकोटिन, फेनलेफ्राइन, फेनलेप्रॉपॅनोमाइन, पिप्राड्रोल, स्युडोफेड्रिन (अटी लागू), सिनेफेरिन आणि मिट्राजिन, मॉर्फिन/कोडेइन, तेपनतांडोल या सर्व घटकांच्या सेवनावर ‘वाडा’चे यापुढे लक्ष असणार आहे. स्पर्धात्मक परिणामांसाठी या घटकांचा वापर होऊ नये, यासाठी ‘वाडा’ने या घटकांना संभाव्य यादीत समाविष्ट केले आहे. वाडाच्या विशेष कार्यकारिणीच्या ब्युनॉस आयर्स (अर्जेटिना) येथे झालेल्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली. ग्लुकोकॉर्टिक घटकालाही या यादीत टाकल्याचे ‘वाडा’ने स्पष्ट केले.
२०१४ वर्षांसाठीच्या प्रतिबंधित उत्तेजके आणि त्या सेवनाच्या विविध पद्धतीला कार्यकारिणीने मान्यता दिली. नवीन यादी १ ऑक्टोबरपासून प्रकाशित होईल आणि १ जानेवारी २०१४ पासून खेळाडूंवर लागू असेल.  
उत्तेजक प्रतिबंध सेवन नियमावलीत सुधारणा, आंतरराष्ट्रीय मानके, विज्ञान आणि संशोधनसाठी निधी, उत्तेजकविरोधी घटकांच्या अभ्यासासाठी प्रयोगशाळा, प्रतिबंधित उत्तेजके आणि त्या घटकांच्या सेवनासंबंधी परीक्षण अशा विविध मुद्दय़ांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

Story img Loader