* एअर इंडियाकडून चव्हाण आणि चंडिला नोकरीतून बडतर्फ
‘क्रिकेट हे आपले स्वप्न आहे’ असे सांगत मोठय़ा झालेल्या क्रिकेटपटूंकडूनच हे स्वप्न काही लाखांच्या मोबदल्यात कसे विकले जाते, हे गुरुवारी साऱ्या जगाने पाहिले. आयपीएलच्या सहाव्या पर्वातील तीन सामन्यांत ‘स्पॉट फिक्सिंग’ केल्याबद्दल राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज एस. श्रीशांत, फिरकीपटू अंकित चव्हाण आणि अजित चंडिला यांना दिल्ली पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री अटक केली आणि क्रिकेटविश्वात भारताची मान खाली गेली. या तिन्ही दगाबाज खेळाडूंना पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. ज्या देशात क्रिकेट हा धर्म समजला जातो, त्या देशातच अशी लाचखोरी करून या तिघांनी तमाम भारतीयांच्या भावनांनाच दगा दिला.
एप्रिल महिन्यामध्ये दिल्ली पोलिसांना आयपीएलमध्ये ‘स्पॉट-फिक्सिंग’चा संशय आला होता आणि त्यावेळी त्यांनी विशेष पथक स्थापन केले. या पथकाने राजस्थानचे सर्व सामने पाहत पुरावे गोळा केले आणि त्यांच्यावर भारतीय दंड विधेयक कलम ४२० (फसवणूक) आणि १२० ब (गुन्हेगारी कट) या अंतर्गत अटक करण्यात आली. त्यानंतर या तिघांना पाच दिवसांची कोठडी देण्यात आली. याप्रकरणी एकूण १४ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.  या फिक्सिंगचा सूत्रधार देशाबाहेर असल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘स्पॉट-फिक्सिंग’ म्हणजे काय?
खेळातील काही ठरावीक भाग (चेंडू किंवा षटक) निश्चित केला जातो. ‘स्पॉट-फिक्सिंग’ करण्यासाठी सट्टेबाजांकडून खेळाडूंना आमिष दाखवले जाते. ठरल्याप्रमाणे गोलंदाज त्यावेळेला नो-बॉल किंवा वाइड-बॉल टाकत असतो. सट्टेबाजांकडून खेळाडूंना तसे करण्यासाठी मोठी रक्कम दिली जाते. ठरावीक चेंडू निश्चित केला जात असल्यामुळे ‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरण शोधून काढणे कठीण जाते. आशिया खंडातील सट्टेबाजारात एका चेंडूवर मोठय़ा प्रमाणात पैसा लागत असल्यामुळे ‘स्पॉट-फिक्सिंग’ करण्याला सट्टेबाजांची अधिक पसंती असते.

५ मे ४ विरुद्ध पुणे वॉरियर्स
वैयक्तिक दुसऱ्या षटकात अजित चंडिला याने बुकींना कबूल केल्याप्रमाणे १४ धावा दिल्या. मात्र, षटक सुरू होण्यापूर्वी सट्टेबाजांना इशारा न केल्यामुळे त्याला काहीही रक्कम मिळाली नाही.

९ मे ४ विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब
श्रीशांतला त्याच्या दुसऱ्या षटकात १४ धावा द्यायच्या होत्या. मात्र, त्याने १३ धावाच दिल्या. तरीही त्याला यासाठी त्याचा मित्र जिजू जनार्दन याच्या मार्फत ४० लाख देण्यात आले.

१५ मे ४ विरुद्ध मुंबई इंडियन्स</strong>
चंडिलाने बुकींशी मध्यस्थी करून ठरवल्याप्रमाणे अंकितला त्याच्या षटकात १४ धावा द्यायच्या होत्या. त्याने आपल्या दुसऱ्या षटकात १५ धावा दिल्या. यासाठी त्याला ६० लाख रुपये देण्यात आले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Spot fixing arrest rocks ipl