काही कारणास्तव धावणे अवघड होत असेल तर फलंदाज ‘रनर’ वापरतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) हा नियम क्रिकेटच्या २२ यार्डामधून रद्द केला असला तरी क्रिकेटच्या राजकारणात याचा बेमालूमपणे अचूक अंमलबजावणी केली ती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी. आयपीएल सट्टेबाजी प्रकरणाच जावई अडकल्यामुळे राजीनाम्याची मागणी होत असताना श्रीनिवासन यांनी नियमांवर बोट दाखवत आपल्या पदाचा त्याग केला नाही, पण चौकशी होईपर्यंत अधिकार सोडण्याची भूमिका मात्र त्यांनी या वेळी घेतली. चौकशी पूर्ण होईपर्यंत हंगामी अध्यक्ष म्हणून माजी अध्यक्ष आणि क्रिकेट क्षेत्रात ‘डॉलरमिया’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जगमोहन दालमिया यांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर सचिव संजय जगदाळे आणि कोषाध्यक्ष अजय शिर्के यांनी आपल्या पदावर पुन्हा कार्यरत व्हावे, अशी विनंती बीसीसीआयने त्यांना केली
आहे.
‘चौकशी होईपर्यंत मी अधिकार सोडत आहे,’ अशी श्रीनिवासन यांनी भूमिका घेतल्यावर काही पदाधिकाऱ्यांनी दालमिया यांना ही जबाबदारी स्वीकारायला सांगितली. श्रीनिवासन यांना विरोध करणाऱ्या अरुण जेटली, राजीव शुक्ला आणि अनुराग ठाकूर यांनीही दालमिया यांच्या नावाला समर्थन दिले. माजी अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाला या पदी शशांक मनोहर हवे होते, पण हे पद पटकावण्यात पवार गटाला अपयश आले. २४ सदस्यीय कार्यकारिणी समितीमधील एकानेही बैठकीमध्ये ‘राजीनामा’ हा शब्द वापरला नाही.
हंगामी अध्यक्षपदाबरोबर स्पॉट-फिक्सिंग प्रकरणाच्या चौकशी समितीमध्येही दालमिया यांचा समावेश करण्यात आला आहे. सचिव संजय जगदाळे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी दालमिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही चौकशी समिती श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मयप्पन आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघाची चौकशी करणार असून त्यानंतर अहवाल बीसीसीआयला सादर करणार आहेत.
काही दिवसांपूर्वी जगदाळे आणि शिर्के यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला होता. यावर बीसीसीआयच्या या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. या चर्चेनंतर जगदाळे आणि शिर्के यांनी आपल्या पदावर २४ तासांत परतावे, अशी विनंती बीसीसीआयने केली. पण या दोघांनीही बीसीसीआयमध्ये परतण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे.
या बैठकीच्या पत्रकामध्ये लिहिले आहे की, एन. श्रीनिवासन यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत आपले अध्यक्षपदाचे अधिकार सोडले आहेत. चौकशी पूर्ण होईपर्यंत जगमोहन दालमिया त्यांचे काम पाहतील. कार्यकारिणी समितीला जगदाळे आणि शिर्के यांच्यावर पूर्ण विश्वास असून त्यांनी राजीनामा मागे घेण्यात यावा, अशी त्यांना विनंती करण्यात आली आहे.
पवारांच्या जवळचे समजले जाणारे शिर्के या बैठकीनंतर म्हणाले की, कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये अध्यक्षपदाबाबत जी व्यवस्था करण्यात आली आणि जो निर्णय घेण्यात आला तो मला पटलेला नाही, पण मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. मी पुन्हा या पदावर काम करणार नाही, हा माझा अंतिम निर्णय आहे. मी, बिंद्रा आणि काही सदस्यांनी या रचनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
याबाबत बिंद्रा म्हणाले की, या बैठकीमध्ये सर्वात जास्त सूचना अरुण जेटली यांनी केल्या. यामध्ये जगमोहन दालमिया यांना हंगामी अध्यक्ष करण्यात यावे, या सूचनेचाही समावेश होता.
ते पुढे म्हणाले की, श्रीनिवासन यांनी राजीनामा दिलेला नाही तर एका महिन्यासाठी त्यांनी आपले अध्यक्षपदाचे अधिकार बहाल केले आहेत. श्रीनिवासन यांनी सप्टेंबपर्यंत आपले अधिकार बहाल करावेत, अशी सूचना मी केली होती. पण त्यांनी मी राजीनामा देणार नाही, असा पवित्रा कायम ठेवला होता.
काय हवे होते ?
१ आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीमध्ये (आयसीसी)
भारताकडून प्रतिनिधित्व करता यावे.
२ राजीनामा दिलेले सचिव संजय जगदाळे आणि कोषाध्यक्ष
अजय शिर्के हे त्यांना पुन्हा कार्यकारिणीत नको होते.
३ अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्यासाठी शशांक मनोहर नको
होते. अरुण जेटली चालले असते.
४ चौकशीनंतर निर्दोष सापडले तर पुन्हा अध्यक्षपदी
नियुक्ती करण्यात यावी.
काय मिळाले ?
१ श्रीनिवासन यांनी आपले अधिकार सोडले असले तरी त्यांना
आयसीसीमध्ये भारताकडून प्रतिनिधित्व करता येणार आहे.
२ जगदाळे आणि शिर्के यांना पदभार स्वीकारण्यास
बीसीसीआयने विनंती केली आहे, पण ते त्यासाठी राजी नाहीत.
३ हंगामी अध्यक्षपदासाठी शशांक मनोहर यांनी नकार दिला
असून जगमोहन दालमिया यांनी हे पद स्वीकारले आहे.
४ चौकशीनंतर निर्दोष सापडले तर पुन्हा अध्यक्षपदाचे अधिकार
पुन्हा श्रीनिवासन यांना देण्यात येणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा