आयपीएल स्पॉट-फिक्सिंग प्रकरणाची चौकशी करणाऱ्या दिल्ली पोलिसांच्या अधिकाऱ्यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) लाचलुचपत प्रतिबंध समितीचे अध्यक्ष रवी सवानी यांनी भेट घेतली. दिल्ली पोलिसांच्या अधिकाऱ्यांबरोबरची बैठक महत्त्वपूर्ण होती आणि ती चांगल्या वातावरणात पार पडल्याचे सवानी यांनी सांगितले.
बीसीसीआयच्या रविवारी झालेल्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीमध्ये या प्रकरणासाठी चौकशी समिती नेमण्यात आली असून सवानी या समितीचे प्रमुख आहेत.
दिल्ली पोलीस कमिशनर नीरज कुमार आणि त्यांच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर माझी बैठक झाली असून ती लाभदायक झाली आहे. बीसीसीआयने दिल्ली पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी दाखवली असल्याचे सवानी सांनी सांगितले.
राजस्थान रॉयल्सने या तिन्ही दोषी खेळाडूंविरोधात तक्रार दाखल केली, याबाबत स्पष्टीकरण देताना सवानी म्हणाले की, हे तिन्ही दोषी खेळाडू राजस्थान रॉयल्स या संघाचे आहेत. त्यामुळे बीसीसीआयने त्यांना दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल करायला सांगितली. कारण या साऱ्या प्रकरणाचा विपरीत परिणाम आणि त्रास राजस्थानच्या संघाला सर्वात जास्त झाला आहे. त्यामुळे खेळाडूंवर गुन्हा दाखल करायची जबाबदारी त्यांची आहे.
या तीन खेळाडूंव्यतिरिक्त अन्य काही खेळाडूंच्या मागावर दिल्ली पोलीस आहेत का, असे विचारल्यावर सवानी म्हणाले की, हे बोलण्याचा अधिकार माझा नाही आणि या विषयावर मी आताच्या घडीला काहीही सांगू शकत नाही.
बीसीसीआय याबाबतीत पुढे काय पावले उचलणार, असे विचारल्यावर सवानी म्हणाले की, बीसीसीआयने या प्रकरणासाठी शाक चौकशी समिती नेमली आहे आणि तिची जबाबदारी माझ्यावर आहे. मी अहवाल सादर केल्यावर बीसीसीआयची शिस्तपालन समिती त्यानुसार कारवाई करेल. मला मर्यादित असा कार्यकाल दिलेला नाही, कारण पुरावे गोळा करण्यासाठी वेळ लागू शकतो, तो किती लागेल हे आत्ता सांगता येणार नाही.

Story img Loader