आयपीएलच्या सहाव्या हंगामाला काळिमा फासणाऱ्या स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणाशी चेन्नई सुपर किंग्जचा संबंध असल्याचे कोणतेही पुरावे नसल्याचा निर्वाळा द्विसदस्यीय न्यायाधीशांच्या चौकशी समितीने दिला आहे. त्यामुळे आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळा (बीसीसीआय)चे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
टी. जयराम चौटा आणि आर. सुब्रमण्यम या निवृत्त न्यायाधीशांच्या समितीने आपला चौकशी अहवाल बीसीसीआयकडे सकाळी सुपूर्द केला होता. रविवारी झालेल्या बीसीसीआयच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीसमोर तो सादर करण्यात आला. त्यानुसार तामिळनाडूतील व्यावसायिक श्रीनिवासन क्रिकेट प्रशासनात परतू शकतील.
चेन्नई सुपर किंग्जचा टीम प्रिन्सिपल असलेला श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मयप्पन, राजस्थान रॉयल्स संघ आणि त्याचे सहमालक राज कुंद्रा यांच्या स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणाशी असलेल्या संबंधांची चौकशी करण्यासाठी ही समिती नियुक्त करण्यात आली होती. चौकशी अहवाल आयपीएलच्या प्रशासकीय समितीकडे पुढील कार्यवाहीसाठी सुपूर्द करण्यात आला आहे, असे बीसीसीआयचे प्रभारी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ‘‘नवी दिल्लीमध्ये २ ऑगस्टला आयपीएल प्रशासकीय समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत याविषयी निर्णय घेण्यात येईल,’’ असे दालमिया म्हणाले.
इंडिया सिमेंट्सला या अहवालात दिलासा देण्यात आला आहे का, या प्रश्नाला उत्तर देताना दालमिया म्हणाले की, ‘‘आयपीएल प्रशासकीय समितीच्या बैठकीत चर्चा करून या अहवालासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येईल.’’
नवी दिल्लीमध्ये २ ऑगस्टलाच बीसीसीआयच्या कार्यकारिणी समितीची बैठक होण्याची शक्यता आहे. त्याआधीच श्रीनिवासन बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर परतण्याची शक्यता आहे. गुरुनाथ मयप्पनच्या स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणातील भूमिकेविषयी अद्याप स्पष्टीकरण होत नसल्याने चौकशी आयोग त्याला दिलासा देण्याची शक्यता कमीच आहे.
मयप्पनला ‘क्लीन चीट’ देण्यात आली आहे का, या प्रश्नाला उत्तर देण्याचे बीसीसीआयचे उपाध्यक्ष निरंजन शाह यांनी टाळले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशी अहवालात स्पॉट-फिक्सिंग प्रकरणी मयप्पनवर कोणताही ठपका ठेवण्यात आलेला नाही. परंतु तो सट्टेबाजीत सहभागी असू शकतो. मात्र याविषयी कोणतेही सबळ पुरावे नाहीत.
‘‘चौकशी आयोगाचा अहवाल सकाळीच बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांच्याकडे सादर करण्यात आला. त्यामुळे आमच्याकडे तो आधीच सादर करण्यात आला आहे, हे वृत्त चुकीचे आहे,’’ असे दालमिया यांनी सांगितले.
२ ऑगस्टला होणारी बैठक कोणाच्या नेतृत्वाखाली होणार, या प्रश्नाला उत्तर देताना दालमिया म्हणाले की, ‘‘हे श्रीनिवासनच ठरवतील. श्रीनिवासन याविषयी निर्णय घेऊ शकतील.’’
दालमिया पुढे म्हणाले की, ‘‘बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाचे प्रमुख रवी सवानी यांच्या अहवालासंदर्भात चर्चा झाली. परंतु अजित चंडिला अद्यापही पोलीस कोठडीमध्ये असल्यामुळे ही चौकशी पूर्ण झालेली नाही. सवानी सध्या मुलाच्या लग्नासाठी रजेवर आहेत. त्यामुळे त्यांना परत येऊ दे.’’ आयपीएलच्या प्रशासकीय समितीची आगामी बैठक कोणाच्या अध्यक्षतेखाली होणार हे अद्याप अनुत्तरित आहे. यासंदर्भात दालमिया म्हणाले, ‘‘मी त्यांना पदभार पुन्हा स्वीकारण्याची विनंती केली आहे. शुक्ला यांचा राजीनामा मी स्वीकारलेला नाही.’’
आयपीएल प्रशासकीय समितीच्या व्यासपीठावर या अहवालाची चर्चा होण्याची आवश्यकता आहे. ही समिती अहवालाची तपासणी करून त्यानुसार योग्य तो निर्णय घेईल. त्यानंतरच हा अहवाल सर्वाना कळू शकेल.
जगमोहन दालमिया, बीसीसीआयचे प्रभारी अध्यक्ष
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा