मुंबई पोलिसांची नजर असलेल्या मय्यपनने चौकशीसाठी हजर राहण्याकरिता मुंबई पोलिसांकडे सोमवापर्यंतचा वेळ मागितला आहे. मात्र विंदूच्या चौकशीतून गुरूनाथभोवतीचा फास अधिकच घट्ट होत असल्याचे दिसत आहे. आयपीएल सट्टेबाजीत खुद्द बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मय्यपनचे नाव समोर आल्याने खळबळ उडाली आहे. आयपीएल सामन्यादरम्यान गुरुनाथ सातत्याने सट्टेबाज विंदूच्या संपर्कात होता. या मोसमात गुरूनाथ एक कोटी रुपये हरल्याची माहितीही विंदूने पोलिसांना दिली आहे. चेन्नईमधील एका पार्टीत विंदू आणि गुरुनाथ याची भेट झाली. सुमारे ६ ते ७ वर्षांपासून दोघांची मैत्री आहे. गुरूनाथच्या घनिष्ठ मैत्रीमुळेच विंदू क्रिकेटर्सच्या जवळ पोहोचला होता. विंदू चेन्नई सुपर किंग्ज सामन्यात व्हीआयपी बॉक्समध्ये कप्तान महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी हिच्या बाजूला बसला होता. गुरुनाथमुळेच त्याला व्हीआयपी जागा मिळाली होती.
विंदूच्या माहितीची सत्यता पडताळण्यासाठी मुंबई पोलिसांचे एक पथक बुधवारी रात्री चेन्नईला रवाना झाले होते. गुरुवारी चेन्नई पोलिसांच्या मदतीने हे पथक गुरुनाथच्या घरी आणि कार्यालयात गेले. परंतु गुरुनाथ भेटला नाही. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या घरावर समन्स चिकटवले, तसेच कार्यालयातील व्यवस्थापकाच्या हाती समन्सची प्रत दिली. शुक्रवारी सकाळी ११ ते ५ या वेळेत मुंबई गुन्हे शाखेत जबाब नोंदविण्यासाठी हे समन्स बजावण्यात आल्याची माहिती सहपोलीस आयुक्त (गुन्हे) हिमांशू रॉय यांनी दिली.
अच्छा हुआ पिताजी नही है..
प्रतिनिधी, मुंबई</strong>
आयपीएल सट्टेबाजीप्रकरणी मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेला विंदू दारा सिंग पोलिसांसमोर धडाधडा बोलत आहे. चौकशीत विंदूने पोलिसांना बरीच धक्कादायक माहिती पुरवली आहे. त्याच्या दाव्याची सत्यता पोलीस पडताळून पहात आहेत. मला सट्टेबाजीचे भयंकर व्यसन होते, अशी कबुली त्याने पहिल्याच दिवशी दिली होती. चौकशीत तो पोलिसांपुढे अक्षरश: गडगडला होता. यापुढे मी सट्टेबाजी काय आयपीएलसुद्धा बघणार नाही, असे त्याने पोलिसांना सांगितले. या प्रकरणामुळे माझी आणि कुटुंबियांची खूप बदनामी झाली आहे. ‘अच्छा हुआ ये सब देखने पिताजी नही है’, असे त्याने पोलिसांना सांगितले.
बॉलिवूडचे तारेतारका सहभागी!
विंदूच्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. बॉलिवूडचे काही अभिनेते आणि अभिनेत्री विंदूच्या मार्फत सट्टा लावत होते. अटकेत असलेला सट्टेबाज रमेश व्यास हा पाक आणि दुबईच्या पंटरच्या संपर्कात होता. तेथील सट्टेबाजांच्या सहभागामुळे दाऊद इब्राहिमचेही नाव समोर येत आहे. मुंंबई पोलीस याप्रकरणी अंडरवर्ल्डच्या कनेक्शनची चौकशी करत आहे.