मुंबई पोलिसांची नजर असलेल्या मय्यपनने चौकशीसाठी हजर राहण्याकरिता मुंबई पोलिसांकडे सोमवापर्यंतचा वेळ मागितला आहे. मात्र विंदूच्या चौकशीतून गुरूनाथभोवतीचा फास अधिकच घट्ट होत असल्याचे दिसत आहे. आयपीएल सट्टेबाजीत खुद्द बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मय्यपनचे नाव समोर आल्याने खळबळ उडाली आहे. आयपीएल सामन्यादरम्यान गुरुनाथ सातत्याने सट्टेबाज विंदूच्या संपर्कात होता. या मोसमात गुरूनाथ एक कोटी रुपये हरल्याची माहितीही विंदूने पोलिसांना दिली आहे. चेन्नईमधील एका पार्टीत विंदू आणि गुरुनाथ याची भेट झाली. सुमारे ६ ते ७ वर्षांपासून दोघांची मैत्री आहे. गुरूनाथच्या घनिष्ठ मैत्रीमुळेच विंदू क्रिकेटर्सच्या जवळ पोहोचला होता. विंदू चेन्नई सुपर किंग्ज सामन्यात व्हीआयपी बॉक्समध्ये कप्तान महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी हिच्या बाजूला बसला होता. गुरुनाथमुळेच त्याला व्हीआयपी जागा मिळाली होती.
विंदूच्या माहितीची सत्यता पडताळण्यासाठी मुंबई पोलिसांचे एक पथक बुधवारी रात्री चेन्नईला रवाना झाले होते. गुरुवारी चेन्नई पोलिसांच्या मदतीने हे पथक गुरुनाथच्या घरी आणि कार्यालयात गेले. परंतु गुरुनाथ भेटला नाही. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या घरावर समन्स चिकटवले, तसेच कार्यालयातील व्यवस्थापकाच्या हाती समन्सची प्रत दिली. शुक्रवारी सकाळी ११ ते ५ या वेळेत मुंबई गुन्हे शाखेत जबाब नोंदविण्यासाठी हे समन्स बजावण्यात आल्याची माहिती सहपोलीस आयुक्त (गुन्हे) हिमांशू रॉय यांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा