आयपीएल स्पॉट-फिक्सिंग प्रकरणातील आंतरराष्ट्रीय धागेदोरेही आता समोर येऊ लागले आहेत. अटकेत असलेल्या विंदू दारा सिंगने चौकशीदरम्यान पाकिस्तानी पंच असद रौफ यांचे नाव घेतले असून रौफ यांना महागडय़ा भेटवस्तू देण्याची जबाबदारी विंदूवर होती, असे समजते. विंदूशी संपर्कात असलेला बीसीसीआय अध्यक्षांचा जावई गुरूनाथ मय्यपन याच्या चौकशीसाठी चेन्नईत गेलेल्या मुंबई पोलिसांनी त्याला शुक्रवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्ये मय्यपन एक कोटींचा सट्टा हरल्याची माहिती विंदूने दिली आहे. दरम्यान, स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात आणखी तीन क्रिकेटपटू आणि एक संघावर संशय असल्याची माहिती दिल्लीचे पोलीस आयुक्त नीरज कुमार यांनी दिल्याने खेळाडूंची संख्या वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
असद रौफ यांची हकालपट्टी
मुंबई पोलिसांच्या चौकशीच्या रडारवर असलेले पाकिस्तानचे पंच असद रौफ यांची आयसीसीने इंग्लंडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पध्रेतून हकालपट्टी केली आहे. ‘‘मुंबई पोलिसांच्या ‘स्पॉट-फिक्सिंग’ संदर्भातील चौकशीत रौफ यांचे नाव आढळल्याने रौफ यांना चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धापासून दूर ठेवण्यात आले आहे,’’ अशी माहिती आयसीसीचे मुख्य कार्यकारी डेव्ह रिचर्डसन यांनी दिली.
आणखी तीन खेळाडू, आयपीएल संघ रडारवर
‘स्पॉट-फिक्सिंग’ संदर्भात आणखी किमान तीन खेळाडू आणि एक आयपीएल संघ पोलिसांच्या रडारवर असल्याची धक्कादायक माहिती गुरुवारी दिल्लीचे पोलीस आयुक्त नीरज कुमार यांनी दिली. ‘‘स्पॉट-फिक्सिंगमध्ये हा संघ आणि अन्य तीन खेळाडू कोणती भूमिका बजावत आहेत, याची आम्ही सखोल चौकशी करीत आहोत. आम्ही ठोस पुरावे शोधत असल्यामुळे सध्या तरी ही नावे आम्ही जाहीर करू शकत नाही,’’ अशी माहिती नीरज कुमार यांनी दिली.
देशभरातून २३ सट्टेबाजांना अटक
आता पोलिसांनी सट्टेबाजांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. पश्चिम बंगाल, महाराष्ट्र व राजस्थान या तीन राज्यांमध्ये पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात २३ सट्टेबाजांना अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून नाशिक, ठाणे आणि पुणे येथूनही काही लोकांना अटक करण्यात आली.

Story img Loader