‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणाने पूर्ण देशाला हादरा बसला आहे, पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय), त्यांचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यावर भाष्य करत नसले तरी देशाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी यावर आपले मत चॅम्पियन्स करंडकाला निघण्यापूर्वी व्यक्त करेल, अशी आशा देशवासीयांना होती, पण स्वप्न सत्यात उतरवणारा आणि नेहमीच आशावादी असलेला धोनी मात्र बीसीसीआयसारखाच अळीमिळी गुपचिळी राखून पत्रकार परिषदेत गप्प बसला.
पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला भारतीय संघाचे प्रसारमाध्यम व्यवस्थापक आर. एम. बाबा यांनी पत्रकारांना फक्त चॅम्पियन्स करंडक या विषयावरच प्रश्न विचारता येतील, असे सांगितले खरे, पण त्याच वेळी पत्रकारांनी या प्रस्तावाला विरोध केला. आम्ही काय प्रश्न विचारायचे ते आम्हाला ठरवू द्या, असे म्हणत पत्रकारांनी त्यांना जुमानले नाही.
 हे ‘बाबा’ तामिळनाडू असोसिएशनचे पदाधिकारी आहेत आणि बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या फार जवळचे आणि विश्वासातले समजले जातात. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांचीच अरेरावी पाहायला मिळाली आणि जणू श्रीनिवासन यांचे जावई असल्याचा आविर्भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
पत्रकार परिषदेतील पहिले काही प्रश्न स्पर्धेवर आले खरे, पण त्यानंतर धोनीला ‘स्पॉट-फिक्सिंग’बाबत प्रश्न विचारायला सुरुवात झाली. या वेळी बाबा यांनी कर्णधार, प्रशिक्षक, व्यवस्थापक यांना न विचारताच प्रश्नांना बगल देण्याचे काम चोख बजावले. खरे तर धोनीची देहबोली या प्रश्नांवर उत्तर देण्यासारखी होती, काही वेळा तो सरसावलाही, पण त्याने अखेर स्वत:ला बेमालूमपणे रोखले.
स्पॉट-फिक्सिंग प्रकरण ताजे असतानाच संघासाठी काही नवीन मार्गदर्शक तत्त्वे आहेत का, असे संघ व्यवस्थापक रणजीत बिस्वाल यांना विचारले असता, त्यांनी सुरुवातीला यावर भाष्य करणे टाळले. एक भीती कुठे तरी त्यांच्या मनात नक्कीच होती, ती देहबोलीतून जाणवली. अखेर सर्व आपल्या उत्तरासाठी आसुसलेले आहेत, हे पाहिल्यावर घाबरतच त्यांनी ‘नाही, काही नवीन मार्गदर्शक तत्त्वे संघासाठी नाहीत,’ असे उत्तर दिले.
स्पॉट-फिक्सिंगबाबत प्रश्न विचारल्यावर धोनी सुरुवातीला स्मितहास्य करायचा आणि हे हास्य त्याच्या चेहऱ्यावर प्रश्न संपेपर्यंत कायम असायचे. धोनी नेहमीच शिताफीने वादविवादांपासून लांब राहिलेला आहे आणि तेच त्याने या वेळीही चोखपणे बजावले, पण एक देशाचा कर्णधार म्हणून देशांतर्गत क्रिकेटमध्ये जे काही घडतेय, त्यावर त्याने आपले मत मांडायला हवे होते. उत्तर द्यायचे टाळून त्याने वादविवाद टाळले खरे, पण यापुढे क्रिकेटला धर्म मानणाऱ्या भारतीयांच्या डोळ्याला डोळा भिडवून धोनी विश्वासाने काही सांगू शकेल का आणि देशवासीय त्याच्यावर पूर्वीएवढाच विश्वास ठेवतील का, हे प्रश्न अनुत्तरितच राहिले.