‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात सहभाग असल्याचे सांगत यात आणखी मोठय़ा व्यक्तींचा समावेश असल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले. दरम्यान, क्रिकेटपटू एस, श्रीशांतसह अजित चंडिला आणि अंकित चव्हाण या अटक करण्यात आलेल्या तिन्ही क्रिकेटपटूंना न्यायालयाने ४ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. श्रीशांतची तिहार जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. लग्नाच्या सोहळ्यासाठी आपल्याला जामीन देण्यात यावा, असा अंकित चव्हाणचा जामीनअर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. अभिनेता विंदू दारा सिंग याला पोलिसांनी बोलते केले असून त्याच्या डायरीतील अनेक सांकेतिक भाषांचा अर्थ समजण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे.
‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणी अटक करण्यात आलेले क्रिकेटपटू एस. श्रीशांत, अजित चंडिला यांच्यासहित दोन सट्टेबाजांना दिल्ली न्यायालयाने ४ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीची शिक्षा मंगळवारी सुनावली आहे. एस. श्रीशांतच्या चौकशीसाठी आणखी दोन दिवस त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यासंदर्भात दिल्ली पोलिसांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. यावेळी राजस्थान रॉयल्सचा क्रिकेटपटू अंकित चव्हाणची जामीन याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. श्रीशांतच्या जामीन याचिकेवर ४ जूनला सुनावणी आहे.
श्रीशांतच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यासंदर्भात दिल्ली पोलिसांच्या विशेष विभागाने केलेली याचिका मुख्य महानगर दंडाधिकारी लोकेश कुमार शर्मा यांनी फेटाळून लावली. श्रीशांतला अटक झाल्यानंतर त्याची हॉटेलमधील खोली साफ करण्यात आली, याचप्रमाणे वस्तू तेथून हलविण्यात आल्या, असे मुद्दे या याचिकेमध्ये दिल्ली पोलिसांनी नमूद केले होते. ‘‘या मुद्दयांवरून ओरापीच्या विरोधात निर्णय देणे हे अन्यायकारक ठरेल. या चौकशी कोणतेच नवे मुद्दे नसताना श्रीशांतला पोलीस कोठडीत का ठेवावी,’’ असा सवाल न्यायालयाने यावेळी विचारला.
‘‘हॉटेलच्या रूममधून हलविण्यात आलेले सामान हे श्रीशांतचेच होते, हे कसे काय तुम्ही सिद्ध करू शकता. ते कुणीही हा डाव रचू शकतो,’’ असे वकिलांनी यावेळी विचारले. याशिवाय चंडिला आणि अन्य दोन सट्टेबाज आशिष अगरवाल आणि चंद्रेश पटेल यांनासुद्धा पोलिसांनी न्यायालयीन कोठडी दिली आहे. या तिघांच्याही आणखी पोलीस चौकशीची आवश्यकता नसल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे.
यासंदर्भातील युक्तीवादात वरिष्ठ सरकारी वकील राजीव मोहन यांनी न्यायालयाला सांगितले की, अटक करण्यात आलेल्या व्यक्तींना आलेल्या दूरध्वनींच्या नोंदीच्या आधारे अनेक मोठी नावे यात गुंतल्याचा संशय आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊन इब्राहिमचा दूरध्वनी आल्याचेही या नोंद सांगतात.
श्रीशांतची तिहार जेलमध्ये रवानगी
नवी दिल्ली : क्रिकेटच्या माध्यमातून दुनियेची सैर करणाऱ्या श्रीशांतचा पत्ता आता तिहार जेल, कोठडी क्रमांक एक असा होणार आहे. ‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणी श्रीशांतला ४ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून अट्टल गुन्हेगारांना ठेवण्यात येणाऱ्या तिहार जेलमध्ये त्याची रवानगी करण्यात येणार आहे. क्रिकेटपटू तसेच बुकींना तुरुंगातील चौकशीसाठी ठेवण्याची दिल्ली पोलिसांची विनंती दिल्ली कोर्टाने फेटाळत श्रीशांत, अजित चंडिलासह दोन बुकींना तिहार जेलमध्ये पाठवण्यात आले.
अंकित चव्हाणची जामीन याचिका न्यायालयाने फेटाळली
पीटीआय, नवी दिल्ली
स्पॉट-फिक्सिंग प्रकरणी निलंबित करण्यात आलेला राजस्थान रॉयल्सचा फिरकी गोलंदाज अंकित चव्हाणचा जामीन अर्ज दिल्ली न्यायालयाने फेटाळून लावला आहे. अंकितचा २ जूनला विवाह असून, आपल्याला त्यासाठी जामीन द्यावा, अशी त्याची मागणी मुख्य महानगर दंडाधिकारी लोकेश कुमार शर्मा यांनी फेटाळला.सामाजिक भावना जामीन देण्यासाठी योग्य कारण असू शकत नाही, असे बचावपक्षाने न्यायालयात सांगितले. आरोपीच्या गुन्ह्णााची तीव्रता आणि सहआरोपींसोबतचा कट पाहता अंकितला नियमित जामीन किंवा अंतरिम जामीन देणे योग्य ठरणार नाही, असे दंडाधिकाऱ्यांनी सांगितले.
चव्हाणच्या वतीने त्याचे वकील राजीव शंकर द्विवेदी यांनी युक्तीवाद केला की, याप्रकरणी अंकितविरुद्ध कोणतेही थेट पुरावे नाहीत. त्याला यात गोवण्यात आलेले आहे. अंकितचा विवाह २ जूनला निश्चित करण्यात आला असून ३१ मेपासून लग्नाची तयारी सुरू होणार आहे. त्याच्या लग्नाच्या आमंत्रण पत्रिका सर्वाना पाठविण्यात आल्या असून, ही तयारी अंतिम टप्प्यात आहे.
कोलकाता-बंगळुरू सामन्यावरही संशय
नवी दिल्ली : राजस्थान रॉयल्सचा खेळाडू अजित चंडिला आणि काही सट्टेबाजांनी चौकशीदरम्यान दिलेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांना कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात १२ मे रोजी झालेला सामना निश्चित असल्याचा पोलिसांना संशय आहे.
‘‘या सामन्याबाबत आमच्याकडे कोणतेही ठोस पुरावे नाहीत. त्यामुळे चंडिला आणि काही सट्टेबाजांनी केलेल्या दाव्याच्या आधारे हा सामना निश्चित असल्याचा निष्कर्ष आम्ही काढू शकत नाही,’’ असे दिल्ली पोलिसांनी सांगितले. ‘‘कोलकाता आणि बंगळुरू यांच्यातील सामना कोण जिंकणार, असे सट्टेबाजांनी चंडिलाला विचारले होते. त्यावर कोलकाता बाजी मारणार, असे उत्तर चंडिलाने दिले होते. हा सामना कोलकातानेच जिंकला,’’ असे दिल्ली पोलिसांनी सांगितले. सट्टेबाजांनी चंडिलाला त्यासाठी ३० लाख रुपये देण्याचे ठरवले होते. पण या सामन्यात आपले बरेच नुकसान झाल्याचे सांगून सट्टेबाजांनी ही रक्कम चंडिलाला देण्यास नकार दिला.

Story img Loader