आयपीएलमधील स्पॉट-फिक्सिंगप्रकरणी खेळाडूही गुंतलेले असून त्यांचीही चौकशी करणार का, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) केली आहे.
स्पॉट-फिक्सिंगप्रकरणी आपल्यावर झालेल्या आरोपांच्या पाश्र्वभूमीवर बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी स्पॉट-फिक्सिंगतसेच सट्टेबाजी प्रकरणाच्या चौकशीसाठी दोन सदस्यीय समिती स्थापन केली होती. या समितीला आणि आयपीएल गव्हर्निग कौन्सिलला ‘क्रिकेट असोसिएशन ऑफ बिहार’ने याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. न्यायमूर्ती एस. जे. वझिफदार आणि न्यायमूर्ती एम. एस. सोनाक यांच्या खंडपीठासमोर त्यावर सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने बीसीसीआयकडे ही विचारणा केली.
त्या वेळेला ‘चेन्नई सुपर िकंग्ज’चे सदस्य आणि श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मयप्पन, इंडिया सिमेन्ट्स, जयपूर क्रिकेट आणि ‘राजस्थान रॉयल्स’चे सहमालक राज कुंद्रा यांची या समितीद्वारे चौकशी करण्यात येत असल्याची माहिती बीसीसीआयतर्फे न्यायालयाला देण्यात आली. तेव्हा न्यायालयाने ‘ते ठीक आहे. परंतु खेळाडूंच्या चौकशीचे काय’, असा सवाल करत आणि ‘स्पॉट-फिक्सिंग मध्ये खेळाडूही गुंतलेले होते, याकडे लक्ष वेधत त्यांचीही बीसीसीआय चौकशी करणार का, अशी विचारणा केली. त्यावर चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेली समिती त्यादृष्टीनेही चौकशी करत आहे. मात्र सध्या तरी समितीतर्फे खेळाडूंची कुठल्याही प्रकारे चौकशी केली जात नसून ती स्वतंत्रपणे केली जाईल, असे बीसीसीआयच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले. समितीने आतापर्यंत आरोप असलेल्या सगळ्यांची बाजू ऐकून घेतल्याची माहितीही या वेळी देण्यात आली.

Story img Loader