हॉकी हा राष्ट्रीय खेळ असला तरी गेल्या काही वर्षांमध्ये या खेळाबाबत उदासीनता दिसून येत आहे. या खेळाचा प्रसार व्हावा यासाठी येथील काही ज्येष्ठ खेळाडूंनी गेले दोन-तीन वर्षे उपेक्षित भागातील शालेय मुला-मुलींना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. अनेक वेळा पदरमोड करीत हे संघटक हॉकी प्रसाराचे कार्य करीत आहेत, केवळ खेळावरील निस्सीम प्रेमापोटीच.
सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर हॉकीचा सराव करणाऱ्या रक्षक स्पोर्ट्स क्लबतर्फे गेली दोन वर्षे हा मोफत उपक्रम आयोजित केला जात आहे. यंदा या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर असलेल्या उगार येथील श्रीहरी विद्यालयाच्या २४ खेळाडूंकरिता त्यांनी निवासी प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे. पंधरा दिवसांच्या या शिबिरात १० ते १६ वर्षे वयोगटातील मुलांनी भाग घेतला आहे. दररोज सकाळी दीड तास व सायंकाळी दोन तास खेळाच्या प्राथमिक ज्ञानाबरोबरच स्पर्धात्मक तंत्रावरही भर दिला जात आहे. खडकी येथील प्रियदर्शनी क्लबच्या खेळाडूंबरोबर या खेळाडूंचे सराव सामनेही आयोजित करण्यात आले होते. तसेच खेळासाठी पूरक व्यायाम, हॉकी सामन्यांचे लघुपट याद्वारेही त्यांना मार्गदर्शन केले जात आहे. त्याखेरीज पृथ्वी प्रदक्षिणा मोहीम, गिरिप्रेमीची एव्हरेस्ट मोहीम आदी मोहिमांचे लघुपटही त्यांना दाखविण्यात आले आहेत.
रक्षक क्लबचे (पूर्वीचा सारसबाग क्लब) ज्येष्ठ खेळाडू अरुण नाईक हे मूळचे उगार येथील रहिवासी असल्यामुळे त्यांनी या खेळाडूंना पुण्यात प्रशिक्षणासाठी निमंत्रित केले. रक्षक क्लबतर्फे शिबिरातील सर्व मुलांना हॉकीचे संपूर्ण कीट देण्यात आले आहे. अशोक विद्यालयाने या मुलांची निवास व भोजन व्यवस्था केली आहे. प्रत्येक खेळाडूची वैद्यकीय चाचणी घेऊन त्याप्रमाणे त्याच्याकडील शारीरिक क्षमता व तंदुरुस्तीबाबतही त्यांना मार्गदर्शन केले जात आहे. या शिबिरास मयूरेश सहस्रबुद्धे, मृदुला सहस्रबुद्धे, विशाल साळुंखे, योगेश ससाणे, केतन भामे, यशोवर्धन पवार यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळत आहे.
या खेळाडूंबरोबर श्रीहरी विद्यालयाचे प्रशिक्षक रमेश मठद व परशुराम सारापुरे येथे आले आहेत. शिबिराविषयी मठद यांनी सांगितले, हे शिबिर आमच्या खेळाडूंसाठी खूपच फायदेशीर आहे. गतवर्षी आमच्या शाळेतील तेरा खेळाडूंनी रक्षक क्लबच्या वासंतिक शिबिरात भाग घेतला होता. त्या अनुभवाचा फायदा आम्हाला जिल्हा स्तरावरील शालेय स्पर्धेत विजेतेपद मिळविण्यासाठी उपयोगी ठरला आहे. आमच्याकडे हॉकीसाठी विपुल नैपुण्य आहे. साधारणपणे दररोज शंभर मुले-मुली हॉकीचा सराव करीत असतात. हॉकीसाठी उगार शुगर कंपनीचे प्रफुल्ल शिरगांवकर यांची आम्हाला खूप मदत मिळते. रक्षक क्लबच्या या शिबिरात मिळणाऱ्या मार्गदर्शनाचा आम्हाला खूप लाभ होत आहे. विशेषत: स्पर्धात्मक कौशल्याबाबत आमच्या मुलांना येथे अतिशय नियोजनपूर्वक मार्गदर्शन मिळत आहे.
शिबिरात सहभागी झालेले ओंकार मळवदे व अथर्व शहा हे सर्वात लहान खेळाडू आहेत. शिबिराविषयी ते म्हणाले, आम्हाला येथे खूप छान शिकायला मिळत आहे. सामने खेळताना खूप आनंद मिळतो तसेच वेगवेगळे डावपेचही आम्हाला शिकायला मिळत आहेत. येथे दरवर्षी आम्ही उन्हाळय़ाच्या सुट्टीत खेळावयास येणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिलिंद ढमढेरे, पुणे</strong>

मिलिंद ढमढेरे, पुणे</strong>