Commonwealth Games 2022 : येत्या २८ जुलैपासून इंग्लंडमधील बर्मिंगहॅममध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी ७२ देशांतील जवळपास चार हजार ५०० खेळाडू खेळताना दिसणार आहेत. भारतातून देखील जवळपास २३० खेळाडूंचा सहभाग असलेला चमू बर्मिंगहॅमला जाणार आहे. मात्र, त्यापूर्वीच भारताला मोठा धक्का बसला आहे. पदकांच्या प्रबळ दावेदार असलेल्या दोन महिला खेळाडू उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीत (डोप टेस्ट) दोषी आढळल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंना राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय चमूचा भाग असलेली धावपटू एस धनलक्ष्मी आणि तिहेरी उडीमध्ये राष्ट्रीय विक्रम नावावर असलेली ऐश्वर्या बाबू उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीत दोषी आढळल्या आहेत. जागतिक अ‍ॅथलेटिक्सच्या ‘अ‍ॅथलेटिक्स इंटिग्रिटी युनिट’ने (एआययु) घेतलेल्या चाचणीत धनलक्ष्मीने प्रतिबंधित स्टेरॉइड्स सेवन केल्याचे निदर्शनास आले आहे.

हेही वाचा – IND vs PAK T20 : पुन्हा रंगणार भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा थरार; राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये चाहत्यांना मिळणार पर्वणी

एस धनलक्ष्मी शंभर मीटर आणि ४ बाय १०० मीटरमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार होती. युजीन येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठीदेखील ती भारतीय संघातही होती. पण, व्हिसाच्या समस्येमुळे ती जाऊ शकली नव्हती. धनलक्ष्मीने २६ जून रोजी ‘कोसानोव्ह मेमोरियल अ‍ॅथलेटिक्स मीट’मध्ये २०० मीटरमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.

हेही वाचा – South Africa T20 League : आता आफ्रिकेतही वाजणार आयपीएल फ्रँचायझींचा डंका; टी २० लीगमधील सर्व संघ केले खरेदी

गेल्या महिन्यात चेन्नई येथे झालेल्या राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपदरम्यान राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य विरोधी संस्थेच्या (नाडा) अधिकाऱ्यांनी ऐश्वर्या बाबूचे नमुने घेतले होते. त्याचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ऐश्वर्याने चेन्नईमधील स्पर्धेत तिहेरी उडी मारून राष्ट्रीय विक्रम केला होता. तिने ६.७३ मीटर लांब उडी मारली होती. कोणत्याही भारतीय खेळाडूची ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली होती. यापूर्वी अंजू बॉबी जॉर्जने ६.८३ मीटर लांब उडी मारली होती.