ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धामध्ये स्क्वॉश या खेळाचा समावेश झाला नाही, त्यामुळे सर्वात जास्त दु:ख झाले असेल ते भारतीय स्क्वॉशपटूंना. कारण गेल्या सहा-सात वर्षांमध्ये भारतीय खेळाडूंनी स्क्वॉशमध्ये सातत्याने चमक दाखविली आहे. २२ वर्षीय खेळाडू दीपिका पल्लिकल ही याच खेळाडूंपैकी एक. दीपिकाने अलीकडेच मकाऊ खुल्या स्पर्धेत अजिंक्यपद मिळवून सर्वाचे लक्ष वेधले. या स्पर्धेतील अंतिम फेरीत तिने जागतिक क्रमवारीतील माजी अग्रमानांकित खेळाडू रॅचेल ग्रिनहॅम हिच्यावर रोमहर्षक विजय नोंदविला होता. दीपिकाच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला वयाच्या अवघ्या ११व्या वर्षी प्रारंभ झाला. सबज्युनिअर गटात असताना तिने लंडन येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेत अपेक्षेइतके यश तिला लाभले नसले तरी या खेळाडूकडे आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये चमक दाखविण्याची क्षमता आहे, हे अनुभवी संघटकांच्या नजरेतून सुटले नाही.
बॅडमिंटन व टेनिस या खेळांसारखेच चापल्य स्क्वॉश या खेळात आवश्यक असते. काचेच्या बंद खोलीत होणाऱ्या या खेळात लवकर दमछाकही होते, त्यामुळेच अव्वल दर्जाचे यश मिळविण्यासाठी चिवटपणा आवश्यक असतो. दीपिकाने हे लक्षात घेऊनच लहानपणापासून या खेळात आंतरराष्ट्रीय कारकीर्द करण्याची जिद्द ठेवली. सुदैवाने तिला सराह फिट्झगेरॉल्ड यांच्यासारखी प्रशिक्षक लाभली. सहा वेळा जागतिक विजेतेपद मिळविणाऱ्या सराह या ऑस्ट्रेलियन खेळाडूने कोणतेही हातचे न राखता दीपिकाला प्रशिक्षण दिले आहे.
व्यावसायिक स्क्वॉशमध्ये २००६पासून कारकीर्द करणाऱ्या दीपिकाला कारकिर्दीच्या प्रारंभी सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयश येत होते. आपण नेमके कोठे कमी पडतो, याचा तिने अतिशय बारकाईने अभ्यास केला. खेळातील चुका सुधारण्यावर तिने अधिकाधिक भर दिला. २००८ ते २०११ या कालावधीत तिने शारीरिक तंदुरुस्ती व क्षमता वाढविण्यावरही लक्ष केंद्रित केले. अगदी मोजक्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिने भाग घेतला. त्याचा फायदा तिला २०११नंतर दिसून येऊ लागला. २०११नंतर तिच्या कामगिरीत बऱ्यापैकी सातत्य आले आहे. आतापर्यंत अमेरिकन आँरेज सिटी, अमेरिकन ड्रीड स्पोर्ट्स सीरिज, कॅनडा मीडवूड्ज फार्मसी चषक, हाँगकाँग क्रोकोडाइल चषक आदी अनेक स्पर्धामध्ये तिने विजेतेपद मिळविले आहे. ऑस्ट्रेलियन खुल्या स्क्वॉश स्पर्धेत तिने उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली आहे. जागतिक स्पर्धेत तिने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल गाठली होती. आजपर्यंतच्या या प्रवासात तिने जागतिक क्रमवारीतील पहिल्या दहा क्रमांकातील अनेक खेळाडूंना पराभवाची चव चाखावयास दिली आहे. चीन, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्स व अमेरिकेच्या अनेक अनुभवी खेळाडूंवर तिने मात केली आहे. जागतिक क्रमवारीत पहिल्या दहा खेळाडूंमध्ये तिने स्थान मिळविले आहे. अशी कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू आहे.
वैयक्तिक कामगिरीबरोबरच सांघिक कौशल्य दाखविण्याबाबतही ती कमी पडली नाही. तिने २०१२ मध्ये महिलांच्या जागतिक सांघिक स्पर्धेत भारतास पाचवे स्थान मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. दीपिकाला २०१२चा अर्जुन पुरस्कारही मिळाला आहे. दीपिकाला तिच्या आई-वडिलांनी सतत प्रोत्साहन दिले आहे. स्क्वॉश हा थोडासा महागडा खेळ असला तरी तिच्या पालकांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर तिला जास्तीत जास्त स्पर्धामध्ये भाग घेता येईल, यासाठी वेळोवेळी आर्थिक सहकार्य दिले आहे.
स्क्वॉश या खेळाचा २०२०च्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्पर्धात्मक क्रीडा प्रकार म्हणून समावेश व्हावा, यासाठी भारतीय स्क्वॉश महासंघाने जोरदार मोहीम उघडली होती. दीपिकानेही या खेळाचा ऑलिम्पिकमध्ये समावेश व्हावा यासाठी मोठय़ा प्रमाणावर प्रचार केला होता. २०२४च्या ऑलिम्पिकमध्ये या खेळास स्थान मिळेल, अशी स्क्वॉश संघटकांना आशा वाटत आहे. तसे झाल्यास दीपिकासह भारताच्या दोन-तीन खेळाडूंचे ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न साकार होईल अशी अपेक्षा आहे.
milind.dhamdhere@ expressindia.com

Story img Loader