ऑस्ट्रेलियातील इसपिच खुल्या स्पर्धेच्या जेतेपदामुळे माझ्यावरील अपेक्षांचे ओझे वाढले आहे. दीपिका पाल्लिकल आणि जोश्ना चिनप्पा यांच्याप्रमाणे चांगला खेळ करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, मात्र याचे दडपण वाटत नसल्याचे उद्गार युवा स्क्वॉशपटू अनाका अलानकामोनीने काढले.
इसपिच स्पर्धेच्या विजयाने प्रचंड आत्मविश्वास मिळाला. मात्र अजूनही माझ्या खेळात काही त्रुटी आहेत, त्या टाळून सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न असतो असे अनाकाने सांगितले. भारतात महिला स्क्वॉशपटूंची संख्या मर्यादित असल्याने स्पर्धा तसेच सरावाला फारसा वाव नसल्याचे अनाका सांगते. सीसीआय आयोजित वेस्टर्न इंडिया स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत महिला तसेच १९ वर्षांखालील गटात जेतेपदावर नाव कोरले.
अनाका तसेच महेश माणगावकर या युवा खेळाडूंमुळे स्क्वॉशचे भविष्य उज्ज्वल आहे. मात्र हा खेळ अधिक समाजाभिमुख होण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रीय प्रशिक्षक सायरस पोंचा यांनी व्यक्त केले. अडचणी असूनही अनाकाने २०११ आणि २०१२ मध्ये आशियाई कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धा जिंकली. जागतिक कनिष्ठ क्रमवारीत ती सहाव्या स्थानी आहे. मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर तिने हे यश मिळवले आहे. खेळात आवश्यक सुधारणा करत सातत्यपूर्ण खेळ केल्यास वरिष्ठ गटातही ती चमकेल असा विश्वास पोंचा यांनी व्यक्त केला.