* मुंबईतही गुन्हा दाखल होण्याची शक्यता * देशभर अनेक ठिकाणी पोलिसांचे छापे

आयपीएलमधील ‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणात अटक केलेला राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज एस. श्रीशांतभोवतीचा फास पोलिसांनी आवळला असून तो आणखी गोत्यात येण्याची शक्यता आहे. श्रीशांतचे मुंबईत वास्तव्य असलेल्या एका हॉटेलच्या रूममध्ये छापा मारून मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने शनिवारी त्याचा लॅपटॉप, आयपॅडसह आणखी काही वस्तू ताब्यात घेतल्या. त्याच्यावर मुंबईतही गुन्हा दाखल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. दुसरीकडे, अटक करण्यात आलेल्या तिन्ही क्रिकेटपटूंना मिळालेल्या पैशांचा स्रोत शोधण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत.

राजस्थान रॉयल्स संघाचा मुंबईत मुक्काम असताना श्रीशांतने संघासोबत न राहता वेगळय़ाच हॉटेलमध्ये वास्तव्य केले होते. या पंचतारांकित हॉटेलमधील श्रीशांतच्या तसेच त्याचा मित्र जिजू जनार्दनच्या खोलीवर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने शनिवारी छापा घातला. तेथून लॅपटॉप, आयपॅड, मोबाइल फोन हस्तगत करण्यात आले. श्रीशांतविरुद्ध मुंबईतही गुन्हा दाखल करण्यासाठी पुरावे गोळा करण्याकरिता संबंधित न्यायालयाकडून परवानगी घेण्यात आली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

दिल्लीने विशेष पथक स्थापन करून पैशांचा गैरव्यवहार समोर आणण्यासाठी मुंबई, अहमदाबाद, हैदराबाद आणि कोलकाता या चार शहरांमध्ये पाठवण्यात आले आहे. फरिदाबाद येथील चंडिलाच्या घरी दिल्ली पोलिसांनी शनिवारी दुसऱ्यांदा छापा टाकला असून त्यामधून बरेच धागेदोरे मिळण्याची पोलिसांनी शक्यता आहे. त्याचबरोबर श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिला यांची दिल्ली पोलिसांनी चौकशी केली.

दरम्यान, आज, रविवारी बीसीसीआयच्या कार्यकारिणी समितीची तातडीची बैठक होणार  असून या प्रकरणातील दोषींवर काय कारवाई करायची, यावर विचारविनिमय करण्यात येणार आहे.

Story img Loader