भारताचा वेगवान गोलंदाज आणि राजस्थान रॉयल्सचा खेळाडू एस. श्रीशांतला ‘चुकून किंवा गैरसमजुतीमुळे’ पोलिसांनी अटक केल्याचे त्याच्या वकिलांनी शुक्रवारी स्पष्ट केले आहे.प्रसारमाध्यमांशी बोलताना श्रीशांतचे वकील दीपक प्रकाश यांनी सांगितले की, ‘‘श्रीशांतला चुकून किंवा गैरसमजुतीमुळे अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांना चुकीची माहिती मिळाली आहे, त्यामुळे गैरसमजुतीने त्याला अटक झाली आहे. श्रीशांतने कधीच सट्टेबाजांशी संवाद साधलेला नाही. याशिवाय पैसा किंवा दूरध्वनी स्वीकारलेला नाही. तो प्रामाणिक आहे.’’
‘‘खेळाडूंनी न्यायालयात जाण्यापूर्वी आपला गुन्हा कबूल केला आहे. हे पोलीस चुकीचे सांगत आहेत,’’ असे प्रकाश यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, ‘‘श्रीशांतने कोणतीच कबुली दिलेली नाही. परंतु तरीही त्याचे नाव गोवण्यात आले आहे. तो पोलिसांना संपूर्ण सहकार्य करीत असून, स्वत:ला निर्दोष सिद्ध करेल.’’
सट्टेबाजांना इशारे देण्यासाठी श्रीशांतने टॉवेलचा वापर केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. यासंदर्भात प्रकाश म्हणाले की, ‘‘९० टक्के खेळाडू टॉवेल वापरतात. ही सामान्य गोष्ट आहे. सामना दुपारी ४ वाजता सुरू झाला होता. त्यामुळे टॉवेलची आवश्यकता लागतेच.’’
दरम्यान, अजित चंडिलाच्या वकिलांनीही तो निर्दोष असल्याचा दावा केला आहे.
जिजूने मला स्पॉट-फिक्सिंगमध्ये गोवले -श्रीशांतची कबुली
नवी दिल्ली : सट्टेबाज जिजू जनार्दन यानेच मला आयपीएलच्या स्पॉट-फिक्सिंगमध्ये गोवले, असा कबुलीजवाब वेगवान गोलंदाज एस. श्रीशांतने पोलिसांकडे दिल्याचे वृत्त आहे. दिल्ली पोलिसांच्या चौकशीप्रसंगी श्रीशांत निराश होता.

Story img Loader