आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगमधील आरोपी क्रिकेटपटू एस. श्रीशांत मंगळवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या भ्रष्टाचाराविरोधी समितीचे प्रमुख रवी सवानी यांच्या चौकशीला सामोरा गेला. स्पॉट फिक्सिंगशी आपला कोणताही संबंध नाही आणि आपण निर्दोष आहोत, असे श्रीशांतने सवानी यांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितल्याचे समजते.
आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगवरून १६ मे रोजी राजस्थान रॉयल्सचे क्रिकेटपटू श्रीशांत याच्यासह अंकित चव्हाण आणि अजित चंडिला यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. श्रीशांतची सध्या जामीनावर सुटका झाली आहे. माझे वय आता ३० आहे. अजून थोडेच वर्ष मी क्रिकेट खेळू शकतो. त्यामुळे समितीने आपल्यासंबंधीचा अहवाल लवकरात लवकर बीसीसीआयकडे द्यावा, अशीही विनंती श्रीशांतने सवानी यांच्याकडे केली.
तो म्हणाला, मी निर्दोष आहे. मला अजून क्रिकेट खेळायचे आहे. स्पॉट फिक्सिंगशी माझा कसलाही संबंध नाही आणि मी ते केलेलेही नाही. मला विश्वास आहे की माझ्या कारकीर्दीवर स्पॉट फिक्सिंगचा लागलेला डाग नक्कीच निघून जाईल. माझ्या माहितीप्रमाणे माझा मित्र जिजू जनार्दन हादेखील स्पॉट फिक्सिंगमध्ये सहभागी नव्हता.
या विषयाचा निकाल लवकर लागला नाही, तर आपली क्रिकेट कारकीर्द संपुष्टात येऊ शकते, अशी भीतीही श्रीशांतने पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. आतापर्यंत केवळ श्रीशांतची भ्रष्टाचारविरोधी समितीकडून चौकशी करण्यात आलीये. येत्या काही दिवसांत अंकित चव्हाण आणि सिद्धार्थ त्रिवेदी यांचीही चौकशी भ्रष्टाचारविरोधी समिती करू शकते, अशी माहिती मिळालीये.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा