भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीशांतने आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात एक मोठा खुलासा केला आहे. दोन वेळचा विश्वविजेता वेगवान गोलंदाज असलेल्या श्रीशांतने ”मी हे फक्त १० लाख रुपयांसाठी का करेन?”, असा सवाल केला आहे. श्रीशांतसह, राजस्थान रॉयल्सच्या दोन क्रिकेटपटूंनाही स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अटक करण्यात आली. स्पॉट फिक्सिंगच्या या प्रकरणात भारतीय क्रिकेटमध्ये मोठा भूकंप झाला होता.
श्रीशांत म्हणाला, ”तेव्हा मला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एक महत्त्वाची मालिका खेळायची होती आणि कारकीर्द संपवण्याचे कोणतेही कारण नव्हते. मी इराणी करंडक खेळलो आणि दक्षिण आफ्रिका मालिका खेळण्यास उत्सुक होतो जेणेकरून आम्ही सप्टेंबर २०१३ मध्ये जिंकू. ती मालिका खेळणे हे माझे लक्ष्य होते. मी हे का करू, तेही १० लाखांसाठी? मी मोठेपणा सांगत नाही, पण जेव्हा मी पार्टी करायचो तेव्हा माझ्याकडे जवळपास २ लाखांची बिले असायची.”
तो म्हणाला, ”ही चाहत्यांच्या आणि हितचिंतकांच्या प्रार्थनेमुळे मी त्या स्थितीतून बाहेर येऊ शकलो. मी त्यावेळेस बहुतेक वैयक्तिक देणी रोख स्वरूपात नाही, तर कार्डद्वारे करायचो. जर माझ्याकडे इतकी रोख रक्कम असती, तर मी ती वाटली असती. खरं तर, मी एका सामान्य माणसाचीही काळजी घेतो.” श्रीसंतने दावा केला, की ज्या षटकात सर्व गोष्टी सांगितल्या गेल्या, त्याला एका षटकात १४ पेक्षा जास्त धावा द्याव्या लागणार होत्या, त्याने ४ चेंडूंमध्ये फक्त ५ धावा दिल्या. तेथे नो बॉल, वाइड आणि स्लो बॉल नव्हते. माझ्या अंगठ्यावर शस्त्रक्रिया करूनही मी १३० किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करत होतो.”
हेही वाचा – आयपीएलमधील महेंद्रसिंह धोनीचे हे शेवटचे वर्ष? दिग्गज क्रिकेटपटू म्हणाला…
बंदी उठवल्यानंतर श्रीशांत या वर्षाच्या सुरुवातीला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसह स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतला. त्याने केरळसाठी पाच सामने खेळले, त्याने २७ च्या स्ट्राइक रेटने आणि ९.८८ च्या इकॉनॉमी रेटने चार विकेट घेतल्या. श्रीशांतने २००५ मध्ये श्रीलंकेविरुद्ध नागपूरमध्ये एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. २००७ च्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या मिसबाह-उल-हकचा झेल घेतल्यानंतर त्याची लोकप्रियता वाढली. नंतर तो २०११ मध्ये वनडे विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचाही एक भाग होता.
हा घोटाळा उघडकीस आला तेव्हा श्रीशांत राजस्थान रॉयल्सचा भाग होता. आरोपानंतर अजित चंडिला आणि अंकित चव्हाण या दोन खेळाडूंना श्रीशांतसह अटक करण्यात आली. आरोपातून मुक्त झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने २०१९ मध्ये श्रीशांतवरील आजीवन बंदी उठवली.