क्रिकेटविश्वामध्ये दुबळा समजला जाणाऱ्या श्रीलंकेच्या संघाने १९९६ साली साऱ्यांनाच पहिल्या १५ षटकांमध्ये कशी फलंदाजी करायची हे दाखवून देत विश्वचषक पटकावला आणि त्यानंतर श्रीलंकेला सारेच जण गंभीरतेने घ्यायला लागले. या विश्वचषकाने श्रीलंकेत मोठी क्रांती झाली आणि अनेक गुणवान क्रिकेटपटू येथे घडायला लागले. त्यामधील दोन पराक्रमी खेळाडू म्हणजे कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने. या दोघांनी श्रीलंकेला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले, पण विश्वविजयाची चव मात्र त्यांना चाखता आली नाही. या दोघांचा हा अखेरचा विश्वचषक असेल, त्यामुळे त्यांना विश्वचषकाची भेट देण्यासाठी त्यांचे सहकारी आसुसलेले आहेत. श्रीलंकेने अर्जुन रणतुंगाच्या नेतृत्वाखाली एकमेव विश्वचषक पटकावला. त्यानंतर २००७ आणि २०११ साली त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले, तर २००३ साली त्यांचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. १९९६नंतर श्रीलंकेच्या कामगिरीमध्ये सकारात्मक बदल झालेले असले तरी त्यानंतर त्यांना एकदाही विश्वचषक जिंकता आलेला नाही, त्यामुळे यंदा ते विश्वविजेतेपदाला गवसणी घालणार का, याची उत्सुकता साऱ्यांना असेल.
१९७५मध्ये श्रीलंकेचा संघ खिजगणतीतच नव्हता. कारण हा संघ फक्त पराभव पत्करायला आल्याचे म्हटले जायचे, तर प्रतिस्पर्धी संघासाठी लॉटरी असायचा. या विश्वचषकात श्रीलंकेला एकही सामना जिंकता आला नाही. १९७९ साली झालेल्या विश्वचषकामध्ये तेनेकून यांच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेने विश्वचषकातील पहिल्या विजयाची नोंद केली. ओल्ड ट्रॅफर्डवरील सामन्यामध्ये श्रीलंकेने भारतावर ४७ धावांनी विजय मिळवला. या स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्धचा सामना त्यांना ९ विकेट्सने गमवावा लागला आणि वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना रद्द झाला. त्यामुळे गुणतालिकेत श्रीलंकेने भारताच्या वरचे तिसरे स्थान पटकावले. १९८३मध्ये दुलीप मेंडिस कर्णधार असलेल्या श्रीलंका संघाला सहा साखळी सामन्यांपैकी एकही सामना जिंकता आला नव्हता. १९८७मध्ये पुन्हा मेंडिस यांच्या नेतृत्वाखाली खेळताना श्रीलंकेला साखळी फेरीतील सहाही सामने गमवावे लागले. १९९२मध्ये युवा अरविंद डीसिल्व्हाच्या हाती संघाची धुरा सोपवण्यात आली आणि ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये झालेल्या या विश्वचषकामध्ये श्रीलंकेने दोन सामने जिंकले ते आफ्रिकेतील देशांविरुद्ध. श्रीलंकेने दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांना प्रत्येकी तीन विकेट्सने पराभूत केले.
गेल्या पाच विश्वचषकांमध्ये फक्त तीन सामने जिंकणारा श्रीलंकेचा संघ १९९६मध्ये विश्वचषक जिंकेल, असेल असे कुणालाही वाटले नव्हते. पण कर्णधार अर्जुन रणतुंगाच्या कल्पक नेतृत्वाने कमाल केली. त्याने संघ अशा सर्जकतेने बांधला की त्याला तोडच नव्हती. सातव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या सनथ जयसूर्याला त्याने सलामीला आणले, त्याचा सहकारी म्हणून यष्टीरक्षक रोमेश कालुवितरणाची निवड केली. या दोघांनी पहिल्या १५ षटकांमध्ये फक्त हाणामारी करायची. त्यानंतर गुरुसिंघे, डीसिल्व्हा आणि रणतुंगा हे मधल्या फळीत होतेच. हे पाचही जण बाद झाले की रोशन महानामा आणि हसन तिलकरत्ने हे दोघेही नांगरधारी फलंदाज होते. गोलंदाजीमध्ये मुथय्या मुरलीधरन, चमिंडा वाससारखे दमदार गोलंदाज होते. श्रीलंकेने हा विश्वचषक फलंदाजीच्या जोरावरच जिंकला.
१९९९च्या विश्वचषकात गतविजेता श्रीलंकेचा संघ काय कामगिरी करतो, याकडे साऱ्यांचेच लक्ष होते, पण त्यांनी साफ निराशाच केली. या स्पर्धेत त्यांना साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला होता. २००३मध्ये सनथ जयसूर्याच्या नेतृत्वाखाली संघाने चारपैकी साखळीतील तीन सामने जिंकले, पण त्यानंतर मात्र त्यांना पुढे जाता आले नाही. २००७मध्ये महेला जयवर्धनेने संघाचे नेतृत्व सांभाळत संघाला अंतिम फेरीपर्यंत नेले खरे, पण अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने त्यांच्यावर मात केली आणि त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. २०११मध्ये कुमार संगकाराच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेने नेत्रदीपक कामगिरी करत अंतिम फेरी गाठली, पण अंतिम फेरीत भारताकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागल्याने सलग दुसऱ्यांदा त्यांच्या पदरी निराशा पडली. त्यामुळे आता तिसऱ्या प्रयत्नात विश्वचषक जिंकण्याचाच निर्धार श्रीलंकेच्या संघाने केला आहे.

अपेक्षित कामगिरी
श्रीलंकेने विश्वचषकातील ६६ सामन्यांपैकी ३१ सामने जिंकले आहेत, तर ३२ सामन्यांत पराभव पत्करले आहेत, दोन सामन्यांचा निकाल लागू शकला नसून एक सामना बरोबरीत सुटला आहे. त्यामुळे विजयाची ४९.२१ अशी समाधानकारक टक्केवारी त्यांच्या खात्यावर आहे. ‘अ’ गटामधील श्रीलंकेपुढे ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड यांचे तगडे आव्हान असेल.  बांगलादेशचा संघही चांगल्या फॉर्मात असून तो कोणत्याही संघाला धक्का देऊ शकतो. पण स्कॉटलंड आणि अफगाणिस्तान हे दोन सामने श्रीलंकेसाठी सोपे असतील. त्यामुळे एकंदरीत पाहता श्रीलंकेला बाद फेरीत पोहोचण्यासाठी चांगलाच घाम गाळावा लागणार आहे.

श्रीलंका
(अ-गट)  क्रमवारीतील स्थान : 
सहभाग : १९७५ ते २०१५ (सर्व)
विजेतेपद : १९९६
उपविजेतेपद : २००७, २०११
उपांत्य फेरी :  २००३

संघ : अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), लहिरू थिरीमाने (उपकर्णधार), कुमार संगकारा (यष्टीरक्षक), तिलकरत्ने दिलशान, महेला जयवर्धने, दिनेश चंडिमल, दिमुथ करुणारत्ने, जीवन मेंडिस, थिसारा परेरा, सुरंगा लकमल, लसिथ मलिंगा, धम्मिका प्रसाद, न्युवान कुलसेकरा, रंगना हेराथ, सचित्रा सेनानायके.
प्रशिक्षक : माव्‍‌र्हन अटापट्टू
साखळीतील सामने :
१४ फेब्रुवारी – वि. न्यूझीलंड, २२ फेब्रुवारी – वि. अफगाणिस्तान, २६ मार्च – वि. बांगलादेश, १ मार्च – वि. इंग्लंड, ८ मार्च – वि. ऑस्ट्रेलिया, ११ मार्च – वि. स्कॉटलंड.

बलस्थाने आणि कच्चे दुवे
१९९६च्या विश्वचषकानंतर २००३चा विश्वचषक सोडल्यास श्रीलंकेची आतापर्यंतची कामगिरी चांगली आहे. गेल्या दोन्ही विश्वचषकात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. पण निवृत्तीच्या उंबरठय़ावर असलेल्या संगकारा आणि जयवर्धने यांना विश्वचषकाची भेट द्यायची, असा संकल्प श्रीलंकेच्या संघाने केला आहे. संगकारा, जयवर्धने, तिलकरत्ने दिलशान या त्रिकुटाकडे फलंदाजीचा चांगला अनुभव आहे. त्याचबरोबर अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडिमन आणि लहिरू थिरीमाने यांनीही गेल्या काही वर्षांमध्ये चांगली फलंदाजी केली आहे. गोलंदाजीमध्ये लसिथ मलिंगा हा संघाचा हुकमी एक्का असला तरी तो दुखापतीने त्रस्त असून यामधून सावरल्यास तो विश्वचषक खेळू शकेल. पण मलिंगा खेळणार नसेल, तर श्रीलंकेसाठी हा मोठा धक्का असेल. फिरकीची धुरा यावेळी अनुभवी रंगना हेराथवर असेल.

Story img Loader