आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या संघाला वनडे मालिका पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. श्रीलंकेविरूद्ध सुरू असलेल्या दोन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव केला. यासह श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाचा वनडे मालिकेत २-० असा एकतर्फी पराभव करत मालिका जिंकली आहे. स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्त्वाखाली खेळत असलेल्या वनडे चॅम्पियन संघाला श्रीलंकेने पराभवाचं पाणी पाजलं.
श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत दिलेल्या २८२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ २४.२ षटकांत अवघ्या १०७ धावा करत सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाच्या एकाही खेळाडूला ३० धावांचा टप्पा गाठता आला नाही. संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने सर्वात मोठी २९ धावांची खेळी केली. तर यष्टीरक्षक जोस इंग्लिसने २२ धावा केल्या. तर ट्रॅव्हिस हेड १८ धावा करत बाद झाले. याशिवाय सर्व खेळाडू एकेरी धावांवर बाद झाले आहेत.
श्रीलंकेने दुसऱ्या वनडे सामन्याची नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खेळपट्टीकडून गोलंदाजांना मदत मिळत होती. याचा फटका श्रीलंका संघालाही सुरूवातीला बसला. श्रीलंकेने कुसल मेंडिसच्या शतकाच्या मदतीने २८१ धावांची खेळी केली. यापूर्वी सलामीवीर पथुम निसांका ६ धावा करत बाद झाला तर निशान मधुशंकाने ५१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तर कुसल मेंडिसने ११५ चेंडूत ११ चौकारांसह १०१ धावा केल्या. तर कर्णधार चरिथ असलंकाने ७८ धावा केल्या. तर लियांगेने ३२ धावा करत संघाने निर्धारित ५० षटकांत ४ बाद २८१ धावा केल्या.
२८२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाचा डाव पत्त्यांसारखा कोसळला. ऑस्ट्रेलियाचा संघ २४.२ षटकं फलंदाजी करू शकला. सलामीवीर मॅथ्यू शॉर्ट २ धावा तर ट्रॅव्हिस हेड १८ धावा करू शकला. याशिवाय कर्णधार स्मिथ २९ धावा आणि जोस इंग्लिसने २२ धावांची खेळी केली. याशिवाय सर्व फलंदाज एकेरी धावसंख्येवर बाद झाले आणि परिणामी ऑस्ट्रेलिया १०७ धावा करत सर्वबाद झाला.
श्रीलंकेकडून असिथा फर्नांडो आणि वानिंदू हसरंगाने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तर दुनिथ वेलाल्गेने ४ विकेट्स घेतल्या.
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यात श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते. कोलंबोमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर केवळ २१५ धावांचे लक्ष्य होते, मात्र तरीही संघाने ४९ धावांनी सामना गमावला. ऑस्ट्रेलिया केवळ ३३.५ षटकांत फक्त १६५ धावा करत सर्वबाद झाला. कर्णधार चरिथ असलंका आणि महिश तीक्ष्णा हे श्रीलंकेच्या विजयाचे हिरो ठरले. असलंकाने १२७ धावांची खेळी खेळली तर तीक्ष्णाने ४ विकेट घेतल्या.