Sanath Jayasuriya appointed as head coach of the Sri Lanka team : भारत, इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्धच्या श्रीलंका संघाच्या शानदार कामगिरीनंतर माजी कर्णधार सनथ जयसूर्याची श्रीलंका पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सनथ जयसूर्याची नियुक्ती १ ऑक्टोबर २०२४ पासून ते ३१ मार्च २०२६ पर्यंत करण्यात आली आहे. नुकतेच श्रीलंकेच्या क्रिकेट संघाने घरच्या मैदानावरील कसोटी मालिकेत न्यूझीलंडचा २-० ने क्लीन स्वीप केला होता. गेल्या काही काळापासून श्रीलंकन ​​संघाच्या या कामगिरीत कमालीचे सातत्य दिसून येत आहे. सनथ जयसूर्याने संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून संघाची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या काळात श्रीलंकेने एकदिवसीय मालिकेत भारताचा पराभव केला, त्यानंतर इंग्लंडला त्याच्याच भूमीवर कसोटी सामन्यात पराभूत केले आणि आता न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका जिंकली. त्यामुळे आता सनथ जयसूर्याची श्रीलंकेचा पूर्णवेळ प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीलंका क्रिकेटच्या एका निवेदनानुसार, “श्रीलंका क्रिकेटच्या कार्यकारी समितीने भारत, इंग्लंड आणि न्यूझीलंडच्या नुकत्याच झालेल्या दौऱ्यांवरील संघाची चांगली कामगिरी लक्षात घेऊन हा निर्णय घेतला, जिथे सनथ जयसूर्या हंगामी मुख्य प्रशिक्षक म्हणून संघासोबत होता.”

सनथ जयसूर्या श्रीलंका संघाचा मुख्य प्रशिक्षक नियुक्त –

मुख्य प्रशिक्षक म्हणून जयसूर्याची पहिली जबाबदारी वेस्ट इंडिजविरुद्धचे मर्यादित षटकांचे सामने असतील, जे डंबुला आणि पल्लेकेले येथे खेळले जातील. जयसूर्या यापूर्वी श्रीलंका क्रिकेटचा सल्लागार होता. जुलैमध्ये प्रथमच त्याची हंगामी मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. गेल्या काही महिन्यांत जयसूर्याच्या मार्गदर्शनाखाली, श्रीलंकेने २७ वर्षांत भारताविरुद्ध पहिली द्विपक्षीय एकदिवसीय मालिका जिंकली. त्याचबरोबर १० वर्षांत प्रथमच इंग्लंडला त्यांच्याच भूमीवर कसोटी सामन्यात पराभूत केले. तसेच अलीकडेच मायदेशातील कसोटी मालिकेत न्यूझीलंडला २-० ने हरवले.

हेही वाचा – Saint Lucia Kings : प्रीती झिंटाच्या संघाने CPL 2024 मध्ये पटकावले पहिले जेतेपद, इम्रान ताहिरच्या संघाला चारली पराभवाची धूळ

सनथ जयसूर्याची क्रिकेट कारकीर्द –

१९९१ ते २००७ पर्यंत, सनथ जयसूर्याने ११० कसोटी सामने खेळले आणि ४०.०७ च्या सरासरीने ६९७३ धावा केल्या, ज्यात १४ शतके आणि ३१ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर ४४५ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने ३२.३६ च्या सरासरीने २८ शतके आणि ६८ अर्धशतकांसह १३,४३० धावा केल्या. १९९६ च्या विश्वचषकात श्रीलंकेच्या विजयात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sri lanka cricket board has appointed sanath jayasuriya as the head coach of the sri lankan team vbm