मुंबईच्या वानखेडे मैदानावर श्रीलंकेने दिलेलं १३६ धावांचं आव्हान भारतीय फलंदाजानी पार करत अखेर टी-२० मालिकाही ३-० अशा फरकाने खिशात घातली आहे. कसोटी, वन-डे पाठोपाठ टी-२० मालिका जिंकत भारतीय संघाने घरच्या मैदानावर खेळताना २०१७ या वर्षाचा शेवट गोड केला आहे. श्रीलंकेने दिलेलं आव्हान हे अवघ्या १३६ धावांचं असलं तरीही ते गाठण्यासाठी भारतीय फलंदाजांना चांगलीच कसरत करावी लागली. मोठी भागीदारी रचण्यात भारतीय फलंदाज अपयशी ठरल्याने या सामन्याचा निकाल अखेरच्या षटकात लागला. मध्यंतरीच्या काळात श्रीलंकेच्या गोलंदाजांनी भारताच्या मधल्या फळीला माघारी धाडत सामन्यात चांगलीच रंगत निर्माण केली होती. मात्र दिनेश कार्तिकने १९ व्या षटकाच्या अखेरच्या चेंडुवर षटकार खेचत सामना भारताच्या दिशेने फिरवला. यानंतर विजयासाठी लागणाऱ्या ३ धावा भारतीय फलंदाजांनी लिलया पार करत श्रीलंकेवर ५ गडी राखून मात केली.
श्रीलंकेकडून चमीरा आणि शनका या गोलंदाजांनी मोक्याच्या क्षणी २-२ बळी घेत श्रीलंकेला विजयाच्या जवळ नेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यामध्ये यश आलं नाही. श्रीलंकेविरुद्धची मालिका संपल्यानंतर भारताचा संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे.
- कसोटी, वन-डे पाठोपाठ टी-२० मालिकेत भारत विजयी
- दिनेश कार्तिक-महेंद्रसिंह धोनीकडून भारताच्या विजयाची औपचारिकता पूर्ण
- मैदानावर जम बसलेला मनीष पांडेही माघारी, भारताचा निम्मा संघ माघारी
- फटकेबाजी करण्याच्या नादात हार्दिक पांड्या माघारी, भारताला चौथा धक्का
- श्रेयस अय्यर धावबाद झाल्याने भारताची जोडी फुटली
- अय्यर-पांडे जोडीने भारताचा डाव सावरला, दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी ४२ धावांची भागीदारी
- मात्र फटकेबाजी करण्याच्या नादात रोहित शर्मा माघारी, भारताला दुसरा धक्का
- रोहित शर्मा- श्रेयस अय्यर जोडीकडून भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न
- मात्र सलामीवीर लोकेश राहुलला माघारी धाडण्यात श्रीलंका यशस्वी
- भारतीय सलामीवीरांकडून डावाची आक्रमक सुरुवात
- २० षटकात श्रीलंकेच्या ७ गडी गमावून १३५ धावा, भारताला विजयासाठी १३६ धावांचं आव्हान
- तळातल्या फलंदाजांकडून अखेरच्या षटकात फटकेबाजीचा प्रयत्न
- पांड्याने दूर केला गुणरत्नेचा अडसर, श्रीलंकेला सातवा धक्का
- श्रीलंकेने ओलांडला १०० धावांचा टप्पा, गुणरत्नेची फटकेबाजी
- कर्णधार थिसारा परेरा मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर बाद, लंकेचा सहावा गडी माघारी
- पाठोपाठ कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर गुणथिलका माघारी, लंकेचा निम्मा संघ माघारी
- हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर समरवीक्रमा बाद, श्रीलंकेला चौथा धक्का
- दोघांच्या फटकेबाजीमुळे लंकेने ओलांडला ५० धावांचा टप्पा, चौथ्या विकेटसाठी ३८ धावांची भागीदारी
- गुणरत्ने-समरवीक्रमा जोडीकडून श्रीलंकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न
- ठराविक अंतराने उपुल थरंगा माघारी, उनाडकटचा लंकेला तिसरा धक्का
- संघात जागा मिळालेल्या वॉशिंग्टन सुंदरला लंकेला दुसरा धक्का, कुशल परेराला धाडलं माघारी
- उनाडकटच्या गोलंदाजीवर निरोशन डिकवेला माघारी, लंकेला पहिला धक्का
- श्रीलंकेच्या संघाची अडखळती सुरुवात, भारतीय माऱ्यासमोर आघाडीची फळी ढेपाळली
- कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय