शेवटच्या फळीतील खेळाडू नुवान प्रदीप याने पाच चेंडू खेळून काढले, त्यामुळेच इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटीत श्रीलंकेला पराभव टाळण्यात यश आले. विजयासाठी ३९० धावांच्या आव्हानास सामोरे जाताना लंकेने शेवटच्या दिवसअखेर दुसऱ्या डावात ९ बाद २०१ धावा केल्या.
कौशल सिल्वा व कुमार संगकारा यांनी दुसऱ्या विकेटसाठी केलेल्या ९८ धावांच्या दमदार भागीदारीमुळे एक वेळ लंकेची २ बाद १५९ अशी भक्कम स्थिती होती. त्या वेळी ते विजयाचे लक्ष्य सहज पार करतील असे चित्र निर्माण झाले होते. पण जेम्स अँडरसन याने १४ चेंडूंत तीन विकेट्स घेत खेळाचे चित्र पालटविले. सिल्वा याने शैलीदार खेळ करीत ५७ धावा केल्या, तर संगकारा याने शानदार खेळ करीत ६१ धावा केल्या. अँडरसनच्या प्रभावी गोलंदाजीनंतर लंकेच्या डावाची घसरगुंडी उडाली. त्यांच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी सपशेल निराशा केली.
लागोपाठ विकेट्स पडत गेल्यानंतर लंकेची ८ बाद २०१ अशी स्थिती झाली. शेवटच्या षटकांत इंग्लंडला विजयासाठी दोन बळींची आवश्यकता होती. त्यांच्या स्टुअर्ट ब्रॉड याने पहिल्या चेंडूवर रंगना हेरथ याला तंबूत धाडले. मात्र हेरथच्या जागी आलेल्या प्रदीपने उर्वरित पाचही चेंडू खेळून काढले व इंग्लंडला विजयापासून वंचित ठेवले.
इंग्लंडकडून अँडरसन याने २५ धावांमध्ये चार बळी घेतले, तर ब्रॉडने ४३ धावांत तीन गडी बाद केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संक्षिप्त धावफलक
इंग्लंड : ९ बाद ५७५ घोषित व ८ बाद २६७ घोषित.
श्रीलंका: ४५३ व ९ बाद २०१ (कौशल सिल्वा ५७, कुमार संगकारा ६१, जेम्स अँडरसन ४/२५, स्टुअर्ट ब्रॉड ३/४३, ख्रिस जॉर्डन २/३४).

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sri lanka salvage draw in thrilling first test
Show comments