Dushmanta Chameera set to miss India series due to injury : श्रीलंका दौऱ्यावर असलेला भारतीय संघ २७ जुलै रोजी पहिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. याआधी घरच्या संघासाठी एक वाईट बातमी आली आहे. संघाचा स्टार वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे संपूर्ण टी-२० मालिकेतून बाहेर पडला आहे. अलीकडेच श्रीलंका क्रिकेट बोर्डाने या टी-२० मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला होता, ज्याची धुरा चारिथ असलंकाकडे सोपवण्यात आली होती.
या दौऱ्यात भारतीय संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. त्याचबरोबर एकदिवसीय मालिकेत नियमित कर्णधार रोहित शर्माकडे टीम इंडियाची कमान सोपवण्यात आली आहे. टी-२० मालिकेनंतर भारताला तीन एकदिवसीय सामनेही खेळायचे आहेत.श्रीलंकेच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमीराला टी-२० मालिकेतून बाहेर झाला आहे. दुखापतीमुळे तो मालिकेतून बाहेर पडला आहे.
श्रीलंका संघाला मोठा धक्का –
दुखापत कुठे झाली आणि ती किती गंभीर आहे याबाबत कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडून अधिकृत अपडेट येणे बाकी आहे. चमीराला वगळणे हा श्रीलंकेसाठी मोठा धक्का ठरू शकतो. श्रीलंकेने नुकताच टी-२० मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. टी-20 विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर वानिंदू हसरंगाने कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर चरित असलंकाकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.
हेही वाचा – IND vs SL : ‘मला नाही वाटत ड्रेसिंगरुमध्ये दोघात…’, विराट-गौतमबद्दल आशिष नेहराचं मोठं वक्तव्य
दुष्मंथा चमीरा अनुभवी गोलंदाज –
वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमीराला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा खूप अनुभव आहे. त्याने श्रीलंकेसाठी ५५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ५५ विकेट्स घेतल्या आहेत. त्याच वेळी, त्याने ५२ एकदिवसीय सामन्यात ५६ विकेट घेतल्या आहेत. कसोटी सामन्यांमध्ये त्याने १२ सामने खेळताना ३२ विकेट्स घेतल्या आहेत. चमीरा आयपीएलमध्येही खेळला आहे. त्याने १३ आयपीएल सामन्यात ९ विकेट्स घेतल्या आहेत.
टी-२० मालिकेसाठी दोन्ही देशांचे संघ –
भारत: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद, मोहम्मद सिराज.
हेही वाचा – VIDEO : ‘आपल्या सर्वांना एक दिवस जायचे आहे, पण…’, कॅन्सरशी झुंज देणाऱ्या सहकाऱ्यासाठी कपिल देव भावुक
श्रीलंका : पाथुम निसांका, कुसल झेनिथ परेरा, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, दिनेश चंडीमल, कामिंदू मेंडिस, दासुन शनाका, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेलालगे, महेश तिक्षाना, चामिंडू विक्रमसिंघे, मथिशा पाथिराना, नुवान तुषारा, दुष्मंथा चमीरा, बिनुरा फर्नांडो.